पाच समित्यांवर भाजपराज
By Admin | Updated: July 13, 2015 01:26 IST2015-07-13T01:26:47+5:302015-07-13T01:26:47+5:30
पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणाचे एक आगळेवेगळे रूप समोर आले.

पाच समित्यांवर भाजपराज
गोंदिया : पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणाचे एक आगळेवेगळे रूप समोर आले. सत्ता काबीज करण्यासाठी राजकारण कोणत्या स्तरावर जाऊ शकते हे यातून जिल्हावासीयांना बघावयास मिळाले. कारण या निवडणुकीत देवरी, आमगाव व अर्जुनी-मोरगाव पंचायत समित्यांत कॉंग्रेस व भाजपची अभद्र युती झाली आहे. तर गोंदियात कॉंग्रेसची सत्ता कायम असून तिरोडा पंचायत समिती राष्ट्रवादीने काबीज केली आहे. गोरेगाव व सडक-अर्जुनीत भाजपला स्पष्ट बहुमत असून फक्त सालेकसा पंचायत समितीतच कॉंग्रेस व राष्ट्रवादी साथ-साथ दिसून येत आहेत.
कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत
गोंदिया : जिल्ह्यात सर्वात मोठी पंचायत समिती असलेल्या येथील पंचायत समितीवर कॉंग्रेस पुन्हा कब्जा मिळविला असून सभापतीपदी स्नेहा गौतम तर उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाग घेतला नाही.
२८ सदस्य असलेल्या या पंचायत समितीत कॉंग्रेसचे १५, भाजपचे सात, राष्ट्रवादीचे पाच व अपक्ष एक सदस्य निवडून आला आहे. संख्याबळ बघता कॉंग्रेस येथे आपली सत्ता स्थापीत करणार हे स्पष्ट होते. मात्र यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील दुरावा स्पष्ट दिसून आला. कारण निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाग घेतला नाही. निवडणुकीत स्नेहा गौतम यांची सभापतीपदी तर ओमप्रकाश भक्तवर्ती यांची उपसभापती निवड करण्यात आली. दोघांना १६-१६ मते मिळाली आहेत. तर सभापतीपदासाठी असलेल्या भाजपच्या उमेदवार विमल पटले व उपसभापती पदासाठी असलेले रामराज खरे यांना सात-सात मते मिळाली.
या निवडणुकीला सभागृहात २३ उमेदवार उपस्थित होते. पिठासीन अधिकारी तहसीलदार संजय पवार व सहकारी अधिकारी खंडविकास अधिकारी एस.के.वालकर यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली.
भाजप व कॉंग्रेसची हातमिळवणी
आमगाव : सभापती व उपसभापती पदासाठी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या हेमलता संजय डोये यांची तर उपसभापतीपदी ओमप्रकाश सखाराम मटाले यांची निवड करण्यात आली.
येथील पंचायत समितीवर मागील चाळीस वर्षांपासून सत्ता भोगत असलेल्या भारतीय जनता पक्षाला यावेळी मतदारांनी कौल दिला नाही. परिणामी यंदाच्या निवडणुकीत भाजप चार, कॉंग्रेस तीन तर राष्ट्रवादीचे पाच सदस्य निवडून आले. मात्र मागील चाळीस वर्षांपासून हाती असलेली सत्ता निसटू नये व राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने येथे कॉंग्रेससोबत हात मिळवणी केली. परिणामी सात विरूध्द पाच मतांनी घाटटेमनी पंचायत समिती क्षेत्रातून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या हेमलता संजयकुमार डोये यांची सभापतीपदी तर चिरचाळबांध पंचायत समिती क्षेत्रातून निवडून आलेले भाजपचे ओमप्रकाश सखाराम मटाले यांची उपसभापतीपदी निवड झाली. विशेष म्हणजे तब्बल चाळीस वर्षानंतर तालुक्यात काँग्रेसचा सभापती निवडून आला आहे.
भाजप व कॉंग्रेसच्या या हातमिळवणीमुळे राष्ट्रवादीचे सर्वाधिक पाच उमेदवार असतानाही सभापती व उपसभापतीची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही. चोख पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडली. याप्रसंगी अनेक आप्तेष्ट व कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात पंचायत समितीच्या मैदानात झाली होती. पंचायत समितीच्या सभागृहात पिठासीन अधिकारी प्रशांत काळे व तहसीलदार राजीव शक्करवार यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली.
काँग्रेसच्या हाताला घड्याळ
सालेकसा : येथे कॉंग्रेसने ऐनवेळी भाजपला हुलकावणी देत हाताला घड्याळ बांधल्याने पंचायत समितीवर कॉंग्रेसचे हिरालाल फाफनवाडे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या राजकुमारी विश्वकर्मा निवडून आल्या.
आठ सदस्यीय पंचायत समितीत यावेळी तालुक्यातील मतदारांनी खंडीत जनादेश दिला. त्यामुळे काँग्रेसच्या पदरात चार, भाजपला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रथमच खाते उघडत एक सदस्य निवडून आला. पक्षनिर्मिती नंतर प्रथमच सालेकसा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची एका सदस्यासोबत एन्ट्री झाली.
पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या निवडणुकीत सभापती पदासाठी काँग्रेसकडून हिरालाल फाफनवाडे यांनी तर भाजपकडून प्रमिला दसरिया यांनी अर्ज भरला होता. तर उपसभापती पदासाठी भाजपाकडून प्रतिभा परिहार आणि राष्ट्रवादी कडून राजकुमारी विश्वकर्मा यांनी अर्ज दाखल केला. यात सभापती पदासाठी हिरालाल फाफनवाडे यांना पाच तर प्रमिला दसरिया याना तीन मते मिळाली व फाफनवाडे दोन मतांनी विजयी झाले. तसेच उपसभापती पदासाठी प्रतिभा परिहार यांना तीन तर राजकुमारी विश्कर्मा याना पाच मते मिळाली.
यात परिहार यांना भाजपचे तीन तर विश्वकर्मा यांना काँग्रेसचे चार आणि राका एक अशी पाच मते मिळाली. त्यामुळे राजकुमारी विश्वकर्मा उपसभापती म्हणून विजयी झाल्या. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीत निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून आर.एल. पुराम यांनी काम पाहिले. सोबत प्रभारी तहसीलदार आर.एम. कुंभरे, खंडविकास अधिकारी वाय.एफ. मोटघरे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.
भाजपने काबीज केली सत्ता
सडक-अर्जुनी : सभापती व उपसभापती यांच्या निवडणुकीत पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकाविला आहे. सभापतीपदी कविता रंगारी व उपसभापतीपदी विलास शिवनकर यांची बहुमताने निवड झाली.
१० सदस्य संख्या असलेल्या पंचायत समिती भारतीय जनता पक्षाचे सात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तर कॉंग्रेस पक्षाचा एक सदस्य निवडून आला आहे. सर्वाधिक सदस्य संख्या असल्याने पंचायत समितीत भाजपाचीच सत्ता राहिल हे स्पष्ट झाले होते. दरम्यान रविवारी (दि.१२) पंचायत समिती सभागृहात सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात सभापती पदासाठी कविता रंगारी व उपसभापती पदासाठी विलास शिवनकर यांनी नामांकन अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादीचे सुधाकर पंदरे व इंदु परशुरामकर हे दोन व काँग्रेसच्या गायत्री इरले असे एकंदरीत तीन सदस्य असल्यामुळे यांच्यापैकी कुणाचाच अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे सभापती म्हणून कविता रंगारी व उपसभापती म्हणून विलास शिवनकर यांची वर्णी लागली. पंचायत समिती सदस्य राजेश कठाने, प्रमिला भोयर, गिरधारी हत्तीमार,े गीता टेंभरे, जयशीला जोशी यांनीही निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
तिरोडा : सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस येथे सत्ता स्थापीत करणार हे स्पष्ट होते. त्यानुसार रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत सभापतीपदी उषा संजय किंदरले यांची तर उपसभापती किशोर पारधी यांची निवड करण्यात आली.
१४ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीत राष्ट्रवादीचे १० सदस्य निवडून आले असून भाजपचे फक्त चारच सदस्य असल्याने तालुकावासीयांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा कौल दिला होता. त्यानुसार, निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी उषा किंदरले तर उपसभापती पदासाठी किशोर पारधी यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर भाजपकडून सभापती पदासाठी डॉ. ब्रिजलाल रहांगडाले व उपसभापती पदासाठी रमणिक सयाम यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र राष्ट्रवादीच्या किंदरले व पारधी यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण महिरे व सहायक अधिकारी खंड विकास अधिकारी एन.आर. जमईवार यांनी काम बघितले.
देवरी पंचायत समितीवर महिलाराज
देवरी : १० सदस्य संख्या असलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसची छुपी युती झाल्याने आज रविवारी पार झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी भाजपच्या देवकी मडावी व उपसभापतीपदी काँग्रेसच्या संगीता भेलावे यांची निर्विरोध निवड झाली.
पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत सभापती व उपसभापती पदाची निवडणुक घेण्यात आली. सभापती पदाकरिता फक्त देवकी मडावी यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. तर उपसभापती पदाकरिता काँग्रेसच्या संगीता भेलावे व शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु भाजप व काँग्रेसची युती झाल्याने शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे सभापती व उपसभापती पदाची निवडणुक निर्विरोध पार पडली.
यावेळी आपले नामांकन परत घेवून शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृह सोडले नंतर सभागृहात भाजपचे सदस्य देवकी मडावी, महेंद्र मेश्राम, मेहतराम कोराम, गणेश टोपे, सुनंदा बहेकार, काँग्रेसच्या सदस्या संगीता भेलावे व लखमी सलामे उपस्थित होते. निवडणुकीदरम्यान भाजप व काँग्रेसने आनंद साजरा केला. यावेळी आ. संजय पुराम, माजी आमदार रामरतन राऊत तसेच शेकडो भाजप व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष म्हणजे मुरदोली क्षेत्रातून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्य अर्चना रमेश ताराम निवडणुकीदरम्यान सभागृहात अनुपस्थित असल्याने हा चर्चेचा विषय ठरला. तसेच खंडविकास अधिकारी मेश्राम हे सुद्धा अनुपस्थित होते.
गोरेगावात भाजपचेच राज्य
गोरेगाव : सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पक्षाने पंचायत समितीवर आपलाच सभापती व उपसभापती बसवून राज्य स्थापन केले आहे. १० सदस्य असलेल्या पंचायत समितीत भाजपचे पाच, कॉंग्रेसचे तीन, राष्ट्रवादी एक व अपक्ष एक सदस्य निवडून आला आहे. मात्र आजच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे केवलराम बघेले व अपक्ष सदस्य लिना बोपचे हे गैरहजर राहिल्याने सभापतीपदी दिलीप चौधरी व उपसभापतीपदी सुरेंद्र बिसेन यांची निवड झाली.
काँग्रेस-भाजपची
अभद्र युती
अर्जुनी-मोरगाव : पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसने अभद्र युती केली. सभापतिपदी भाजपचे अरविंद शिवणकर तर उपसभापतीपदी आशा झिलपे यांची बिनविरोध निवड झाली. या अभद्र युतीने राजकारणी तसेच मतदारांना आश्चर्याचा धक्काच बसला.
रविवारी सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. भाजपचे सदस्य सहलीवर होते व त्यांचे वेळेवर आगमन झाले. तत्पूर्वी ठरल्याप्रमाणे काँग्रेसचे तीन उमेदवार सभागृहात झाले. यापैकी आशा इंद्रदास झिलपे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. भाजपतर्फे सभापती पदासाठी अरविंद शिवणकर यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार पैकी एकही सदस्य सभागृहात उपस्थित झाले नाहीत. विरोधात एकही अर्ज नसल्याने दोघांचीही १० विरूध्द शुन्य मताधिक्याने निवड झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, तहसीलदार एच.जे. रहांगडाले, प्रभारी खंड विकास अधिकारी डॉ. नरेश कापगते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी/प्रतिनिधी)