गोंदियातील पराभवाची भाजप समीक्षा करणार

By Admin | Updated: October 19, 2014 23:38 IST2014-10-19T23:38:52+5:302014-10-19T23:38:52+5:30

जिल्ह्यात सर्वत्र भाजपसाठी पोषक वातावरण असताना गोंदियात झालेला पराभव भाजपच्या निष्ठावंतांच्या चांगलाच जिव्हारी लागणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष विनोद

The BJP will review the defeat of Gondiya | गोंदियातील पराभवाची भाजप समीक्षा करणार

गोंदियातील पराभवाची भाजप समीक्षा करणार

गोंदिया : जिल्ह्यात सर्वत्र भाजपसाठी पोषक वातावरण असताना गोंदियात झालेला पराभव भाजपच्या निष्ठावंतांच्या चांगलाच जिव्हारी लागणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी दुसऱ्या गटाकडून त्यांना सहकार्य मिळाले नाही. एवढेच नाही तर खासदार नाना पटोले यांनीही गोंदिया मतदार संघात प्रचारात स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले. गेल्या पाच महिन्यातील त्यांचा गोंदियावासीयांशी संपर्क नसल्यासारखाच होता. त्यामुळे त्यांचे हे वागणे एकूणच भाजपसाठी मारक ठरले. त्यामुळे याची भाजपच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून त्याची समीक्षा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे काही लोकांनी आधी जातीय समीकरणे पेरून मराठी मतांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. ही मराठी, बहुजन मतांची फौज गोंदिया मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार राजकुमार कुथे यांच्या पाठीशी उभी करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांच्या विजयाची खात्री दिसत नसल्यामुळे ही गठ्ठा मते काँग्रेसकडे वळवून भाजप उमेदवाराला पराभवाचे तोंड पहायला लावले, अशीही चर्चा राजकीय वर्र्र्र्र्तुळात सुरू आहे.
महिलांना अव्हेरले
चारही मतदार संघातील एकूण ५४ उमेदवारांमध्ये चार महिला उमेदवार होत्या. पण कोणत्याही महिला उमेदवाराला २० टक्केही मते मिळाले नाहीत. तिरोडा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राजलक्ष्मी तुरकर यांना ३१ हजार १४७, अर्जुनी मोरगावमधून शिवसेनेच्या किरण कांबळे यांना १५ हजार ३३६, गोंदियात भारतीय कॉम्युनिस्ट पक्षाच्या करुणा गणवीर यांना १ हजार ९१, तर आमगाव मतदार संघातून बसपाच्या शारदा उईके यांना ६ हजार १३४ मते मिळाली आहेत.

Web Title: The BJP will review the defeat of Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.