अर्जुनी/मोरगावात भाजपने गड राखला
By Admin | Updated: October 19, 2014 23:39 IST2014-10-19T23:39:12+5:302014-10-19T23:39:12+5:30
अर्जुनी/मोरगाव विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले यांनी विजय संपादन करून भाजपक्षाचा गड राखला. त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेश नंदागवळी यांचा तब्बल ३० हजाराच्या मताधिक्यांनी पराभव केला.

अर्जुनी/मोरगावात भाजपने गड राखला
अर्जुनी/मोरगाव : अर्जुनी/मोरगाव विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले यांनी विजय संपादन करून भाजपक्षाचा गड राखला. त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेश नंदागवळी यांचा तब्बल ३० हजाराच्या मताधिक्यांनी पराभव केला. या मतदारसंघात तब्बल १ हजार ५२८ मतदारांनी नकारात्मक मताचा वापर केला.
आज रविवारी सकाळी ८वाजता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मतमोजणीला सुरुवात झाली. अगदी पहिल्या फेरीपासूनच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या २२ व्या फेरीपर्यंत कायम राखली. काँग्रेसचे उमेदवार राजेश नंदागवळी व राष्ट्रवादीचे मनोहरराव चंद्रीकापुरे यांचेत फेरीनिहाय दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस दिसून आली. सुरुवातीच्या २ फेऱ्यात भाजपखालोखाल दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस दिसून आली. सुरुवातीच्या २ फेऱ्यात भाजपखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला मते मिळाली. तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आघाडी घेतली. परत ४ व ५ व्या फेरीत काँग्रेसने आघाडी घेतली. फेरी क्र. ६ ते १३ पर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने दुसरा क्रमांक राखला. मात्र १४ व्या फेरीत परत काँग्रेस उमेदवाराने आघाडी घेऊन ही आघाडी शेवटच्या २२ व्या फेरीपर्यंत कायम राखली. अखेर राजकुमार बडोले यांना ३० हजार २९५ मतांची आघाडी मिळाली.
विजय घोषीत होताच कृषी उत्पन्न बाजार समितीतून गावातील प्रमुख मार्गाने विजयी मिरवणूक काढण्यात आली. राजकुमार बडोले यांनी हात जोडून मतदारांप्रती आभार व्यक्त केले.
ही निवडणुक यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता निवडणुक निरीक्षक गौतमसिंग यांचे नेतृत्वात निवडणुक निर्णय अधिकारी डी.एम.मनकवडे, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी संतोष महाले, सडक अर्जुनीचे तहसीलदार एन.जे. उईके, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी मोलाची भूमिका बजावली. या मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त पाळण्यात आला. दुचाकी व चारचाकी वाहने मतमोजणी केंद्रापासून सुमारे एक ते दीड किमी अंतरावरच थांबविण्यात आली होती.