भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेसला संमिश्र यश
By Admin | Updated: April 24, 2015 01:35 IST2015-04-24T01:35:51+5:302015-04-24T01:35:51+5:30
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी

भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेसला संमिश्र यश
गोंदिया : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले असताना बुधवारी (दि.२२) गोंदिया तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपला संमिश्र यश मिळाल्याचे गुरूवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालावरून दिसले. मात्र काही ठिकाणी काँग्रेस समर्थक गटाचे पूर्वी असलेले वर्चस्व कमी होऊन त्यांना नुकसानीचा सामना करावा लागला.
गोंदिया तालुक्यातील खमारी, फुलचूर, फुलचूरटोला, चुटिया, घिवारी, कटंगटोला, नागरा व हिवरा या आठ ग्रामपंचायतींसोबत ढाकणी, मुंडीपार (ढा.), किन्ही आणि देवूटोला या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक झाली. तसेच गोरेगाव तालुक्यातील कमरगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुर्रा, बाकटी आणि सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी (ख.) येथे ग्रामपंचायत प्रभागाची पोटनिवडणूक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभरात झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा प्रभाव राहील असे वाटत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी बाजी मारली.
गोंदिया तालुक्यातील ८ सार्वत्रिक आणि ४ पोटनिवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या तहसील कार्यालयाखालील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी १० वाजतापासून सुरू झाली. इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशिनने मतदान झाले असल्याने काही १२.३० वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले. यासोबतच सडक अर्जुनी, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पोटनिवडणुकीसाठी तेथील तहसील कार्यालयात शांततेत मतमोजणी झाली.
जसजसे निकाल जाहीर होत होते तसतसे उमेदवारांच्या समर्थकांकडून गुलाल उधळल्या जात होता. अंतिम निकालानंतर विजयी पॅनलमधील उमेदवारांनी ढोलताळे लावून विजयी मिरवणुका काढल्या.
चुटीयातील एक मत गायब
सार्वत्रिक निवडणूक असलेल्या चुटीया ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ३ उमेदवार रिंगणात होते. या वॉर्डच्या मतमोजणीत तीन युनिटपैकी दोन युनिटमध्ये ५९१ मतदारांनी मतदान केल्याचे दाखवल्या जात होते, तर तिसऱ्या युनिटमध्ये ५९० लोकांनीच मतदान केल्याचा आकडा दाखविल्या जात होता. त्यामुळे यावर एका पराभूत उमेदवाराने आक्षेप घेऊन तक्रार केली. मात्र त्यावर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
हिवरा-नागऱ्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व
हिवरा ग्रामपंचायतीत ९ पैकी ६ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बळकावल्या. तसेच नागरा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आगाडीच्या १२ लोकांनी विजय मिळवून ग्रामपंचायतीवर कब्जा केल्या. मतमोजणीनंतर खा.प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य रमेश लिल्हारे, छोटू पटले, राजकुमार जैन आदींनी त्यांचे स्वागत केले.