भाजप सरकारने पुसली लोकांच्या तोंडाला पाने
By Admin | Updated: November 29, 2014 01:32 IST2014-11-29T01:32:59+5:302014-11-29T01:32:59+5:30
गेल्या ६ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने आणि एक महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.

भाजप सरकारने पुसली लोकांच्या तोंडाला पाने
गोंदिया : गेल्या ६ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने आणि एक महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्वांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या या सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागे करण्यासाठी ८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे दिली.
माजी मंत्री आणि काँग्रस नेते तथा ८ डिसेंबरच्या मोर्चाचे संयोजक नितीन राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल आणि माजी मंत्री भारतभाऊ बहेकार यावेळी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना आ.वडेट्टीवार आणि राऊत यांनी सांगितले की, सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती आहे. यात शेतकरी होरपळून निघत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून ही परिस्थिती आहे. गेल्या दोन वर्षात आमचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना १० हजार २०० कोटी रुपयांची मदत दिली. मात्र यावर्षी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतानांही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तोकड्या मदतीची मागणी केंद्राकडे केली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या धानाला काँग्रेस आघाडीच्या सरकारने प्रतिक्विंटल १५० रुपये भाववाढ दिली होती. याशिवाय २०० रुपये प्रतिक्विंटल बोनसही दिला. मात्र यावेळी भाजपच्या सरकारने बोनस तर दूर, धानाला अवघी ५० रुपये भाववाढ देऊन शेतकऱ्यांबाबत किती संवेदनहीन आहेत याचा परिचय दिला आहे, असाही आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला.
गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमच्यावर तोंडसुख घेणारे भाजपचे मंत्री एकनाथ खडसे आता सरकारमध्ये येताच शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. एलबीटीच्या मुद्द्यावर वेगवेगळी विधाने करून सरकार लोकांना मूर्ख बनवून व्यापाऱ्यांची फसवणूक करीत आहे. आता स्वतंत्र विदर्भाच्या मुद््यावर तरी हे सरकार प्रामाणिक राहून एक वर्षात विदर्भ राज्य करणार का, काँग्रेसचा त्यांना पाठींबाच राहील, असेही यावेळी वडेट्टीवार म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)