भाजपच्या नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन नामंजूर
By Admin | Updated: March 20, 2017 00:55 IST2017-03-20T00:55:35+5:302017-03-20T00:55:35+5:30
धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान भाजपचे नगर सेवक संतोष मोहने यांनी पोलीस अधिकारी शरद आव्हाड यांना पाईपने मारहान केली होती.

भाजपच्या नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन नामंजूर
जिल्हा व सत्र न्यायालय : पोलीस अधिकाऱ्यास मारहाण प्रकरण
तिरोडा : धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान भाजपचे नगर सेवक संतोष मोहने यांनी पोलीस अधिकारी शरद आव्हाड यांना पाईपने मारहान केली होती. सदर पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायालयातून १७ तारखेपर्यंत अटकपूर्व जामीन प्राप्त केला होता. शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाने तो नामंजूर केला.
फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक शरद आव्हाड यांच्या तक्रारीवरून आरोपी भाजपचे नगर सेवक संतोष मोहने याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही माहिती आरोपी मोहने यांना प्राप्त होताच त्यांनी १७ मार्चपर्यंत बेल मिळविण्यात यश प्राप्त केले होते. न्यायालयाने १७ मार्चला हिअरिंग घेतली व १८ मार्चला निर्णय देत अटकपूर्व जामिन नामंजूर केला.
जिल्हा सत्र न्यायालय गोंदियाने जामिन नामंजूर केल्याने आरोपी संतोष मोहने हे पोलिसांना शरण येतात काय? वरच्या न्यायालयात धाव घेतात काय? किंवा पोलीस त्यांना अटक करतात काय? त्यांचा शोध कधी घेणार? त्यांना अटक करून पीसीआर मागणार काय? या बाबींवर तिरोडा शहरातील व परिसरातील नागरिक चर्चा करीत असून त्यांचे लक्ष याकडे लागले आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)