जन्मदात्रीकडून पोटच्या गोळ्याची हत्या

By Admin | Updated: May 9, 2015 01:26 IST2015-05-09T01:26:54+5:302015-05-09T01:26:54+5:30

संशयाची सुई घर उद्ध्वस्त करते. अशाच संशयातून आणि त्यातून निर्माण झालेल्या कलहातून जन्मदात्या आईनेच पोटच्या आठ वर्षीय मुलाची हत्या करून ...

Birth control by the womb of the pill | जन्मदात्रीकडून पोटच्या गोळ्याची हत्या

जन्मदात्रीकडून पोटच्या गोळ्याची हत्या

गोंदिया : संशयाची सुई घर उद्ध्वस्त करते. अशाच संशयातून आणि त्यातून निर्माण झालेल्या कलहातून जन्मदात्या आईनेच पोटच्या आठ वर्षीय मुलाची हत्या करून नंतर स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गोंदिया शहरातील मरारटोली परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका घरात हा थरार मध्यरात्रीनंतर घडला.
पतीशी असलेल्या वादातून सदर महिलेने हे कृत्य केल्याचे बोलले जाते. शुक्रवारच्या पहाटे २.३० वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेने मरारटोली परिसर हादरून गेला आहे. अनुप राजू अलाम (८) असे मृत बालकाचे नाव आहे, तर त्याला मारून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मातेचे नाव प्रीती राजू अलाम (३५) असे आहे.
प्रीतीचे माहेर गडचिरोली जिल्ह्यातील आहे. तिचे पती राजू अलाम हे गोंदियाच्या एसटी आगारात वाहन चालक म्हणून नोकरीवर आहेत. मागील सहा महिन्यांपासून ते मरारटोलीच्या कन्हैय्या भैय्यालाल पारधी (४२) यांच्या घरी भाड्याने राहतात. राजू अलाम यांच्या सासुरवाडीत लग्न समारंभ असल्याने ते १५ दिवसांपासून गडचिरोली येथे कुटुंबासह गेले होते. त्यांची मोठी मुलगी १० वर्षाची तर लहान मुलगा मृतक अनुज हा आठ वर्षाचा होता. मुलीला मामाच्या घरी ठेवून लग्न समारंभावरून ते दाम्पत्य मुलाला घेऊन बुधवारी सायंकाळी गोंदियात आले. रात्रभर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी राजूला ड्युटीवर अमरावती येथे जायचे होते. ते गुरूवारच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अमरावतीला जाण्यासाठी निघाले.
गुरूवारी घरमालक कन्हैया पारधी आपल्या कुटुंबासोबत विशाल लॉन येथे लग्न समारंभाला गेले होते. रात्री ११.३० वाजता आल्यावर घरी शांतता होती. घरमालक पारधी घरी आले त्यावेळी वीज पुरवठा खंडीत झालेला असल्याने ते झोपण्यासाठी छतावर गेले. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते घरकाम करीत असताना त्यांना विहिरीत मोठा आवाज झाला. त्यावर कन्हैया पारधी यांचा लहान भाऊ संतोष विहिरीत कुणीतरी उडी घेतली असे ओरडला. त्यावर शेजारचे लोक धाऊन आले. प्रितीने विहिरीत उडी घेतल्याने संतोष व कन्हैया यांनीही विहिरीत उडी घेऊन तिला वाचविले. (तालुका प्रतिनिधी)
प्रीती अजूनही बेशुद्ध
प्रीतीला विहिरीतून काढले तेव्हापासून आतापर्यंत ती बेशुध्द होती. तिच्या गळ्यावर जखमा होत्या. त्या जखमेतून रक्त निघत नव्हते. वेळीच रूग्णवाहिकेसाठी रामनगर पोलिसांना फोन केला. प्रीतीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर तिचा मुलगा कुठे आहे हे पाहण्यासाठी पारधी कुटुंबीय त्यांच्या खोलीत गेले. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात अनुज पडला होता. चाकूने त्याच्या गळ्यावर दोन घाव केले होते. रामनगर पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०२, ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घरगुती कलहच जबाबदार?
मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रीती राजू अलाम (३५) हिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. ती बेशुद्धावस्थेत असल्यामुळे या प्रकरणाचे कारण पुढे येऊ शकले नाही. परंतु घरगुती वादातून हे कृत्य झाल्याचे बोलले जाते.
पतीचे बयान देणार प्रकरणाची माहिती
प्रीतीचे पती राजू अलाम अमरावती येथे नोकरीसाठी गेल्याने त्यांच्या माघारीच हे कृत्य झाले. त्या पती-पत्नीत काय वाद झाला, याची माहिती पुढे आली नाही. हे प्रकरण काय आहे याची माहिती राजू अलाम यांच्या बयानातून पुढे येणार आहे. सायंकाळपर्यंत त्यांचे बयाण होणे बाकी होते.

Web Title: Birth control by the womb of the pill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.