बिरसीत विनापरवाना लाकडांची कटाई
By Admin | Updated: December 3, 2015 02:04 IST2015-12-03T02:04:34+5:302015-12-03T02:04:34+5:30
तिरोडा वन विभागांतर्गत येत असलेल्या बिरसी येथील आरामशिनवर विनापरवाना लाकडांची कटाई होत असतानाही वनविभागाकडून कारवाई होत नाही.

बिरसीत विनापरवाना लाकडांची कटाई
वन अधिकारी चिडीचूप : सॉ मिल मालकाशी साटेलोटे?
परसवाडा : तिरोडा वन विभागांतर्गत येत असलेल्या बिरसी येथील आरामशिनवर विनापरवाना लाकडांची कटाई होत असतानाही वनविभागाकडून कारवाई होत नाही. त्यामुळे त्या सॉ मिल मालकाशी वनाधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शंका वर्तविली जात आहे. यापूर्वी एका प्रकरणात रंगेहात पकडल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यास सांगितल्यानंतरही स्थानिक अधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी केली.
तिरोडावरुन सहा कि.मी. अंतरावर नागझिरा फॉरेस्ट झोनमध्ये १० कि.मी. अंतरावर मुख्य मार्गावर बिरसी येथे सॉ मील आहे. गेल्या १/७/२०१५ ला लाकुड चिराई करताना सामाजिक कार्यकर्ते राजेश तायवाडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. यात एमएच ३१, डीएस २००५ टाटा एस या गाडीने सुकळी /डाक येथील एका व्यक्तीने निंब व जांभळाचे एकूण ११ नग ०.५५६ घनमीटर लाकुड कसलीही परवानगी घेता चिरानसाठी नेले. सदर सॉ मिलवर लाकुड विनापरवानगीने चिरान करताना दिसले. त्यांनी तत्कालीन सहायक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्प) ठक्कर यांना तक्रार केली. त्यांनी तिरोडा क्षेत्राचे वनाधिकारी एम.के. चाटी यांना चौकशीला पाठविले असता त्यांनी लाकुड व एमएच ३१-डीएस २००५ क्रमांकाची गाडी आढळली व सदर त्या ठिकाणाहून रेंज आॅफीस तिरोडा येथे आणून कार्यालयात पंचनामा करण्यात आला. लाकडाचा जप्तीनामा तयार केला. भा.व.सं. १९२७ चे कलम २६ व ५२अन्वये गुन्हाही दाखल केला, पण सदर माल सुपर्तदार वनरक्षक के.डी. पटले यांच्याकडे दिला.
आरोपी अनंतराम वातु बावनथडे यांच्यावर व सॉ मिल मालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
गाडी मालक रंजनकुमार खेमलाल पटले तिरोडा व सचिन मुकेश तिरपुडे (३५) तिरोडा यांचे बयान पंचनामा सॉ मिलमध्ये जाऊन न करता कार्यालयात बसून राऊंड आॅफीसर व्ही.सी. मेश्राम यांनी केला. साक्षीदार म्हणून गाडी मालक पटले, तिरपुडे यांची स्वाक्षरी घेण्यात आली असल्याचे जप्त अहवालात नमूद आहे.
या प्रकरणाची तक्रार उपवनसंरक्षक गोंदिया यांना करण्यात आली. पण हे प्रकरण थंडबस्त्यात आहे. (वार्ताहर)