बिरसी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:26+5:302021-02-06T04:54:26+5:30
खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील १५ वर्षांपासून अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष व्याप्त ...

बिरसी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू
खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील १५ वर्षांपासून अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष व्याप्त असून, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारपासून बिरसी विमानतळाच्या गेटसमोर १०६ कुटुंबीयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. दरम्यान, या धरणे आंदोलनाला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी भेट देऊन या महिन्याच्या अखेरपर्यंत अतिक्रमण काढून तीन चार महिन्यांत पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका आंदाेलकांनी घेतली आहे.
बिरसी येथील विमानतळासाठी २००६ मध्ये येथील जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, तसेच त्यांची घरेसुद्धा अधिग्रहित करण्यात आली. मात्र, त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. चार वर्षांपूर्वी बिरसी विमानतळ प्राधिकरणाने गोंदिया उपविभागीय कार्यालयाकडे प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन करण्यासाठी निधीसुद्धा जमा केला; पण यानंतरही या १०६ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा आंदोलनसुद्धा केले. लोकप्रतिनिधींना पण निवेदन दिले; पण यानंतरही त्यांची समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदोलन करण्याचा मार्ग पत्करला आहे. या प्रकल्पग्रस्तांची घरेसुद्धा पूर्णपणे जीर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे; पण याची अद्यापही जाणीव शासन आणि प्रशासनाला झाली नाही. त्यामुळेच त्यांनी आता आंदोलनास सुरुवात केली आहे. जोपर्यंत पुनर्वसनाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा निराय राय, शांती दत, बाळकृष्ण तावाडे, सुरेश तावाडे यांनी दिला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अनिल खडतकर, नायब तहसीलदार सिंगाडेे, बिरसी विमानतळाचे संचालक विनय तांबरकार, सरपंद इंदू वंजारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.