सौर ऊर्जेतून बिरसी विमानतळ करणार २५ लाखांची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:07+5:30
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून येथील रेल्वे स्थानकावर सुध्दा सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे महिन्याकाठी लाखो रुपयांचा विजेवर होणार खर्च वाचविण्यास रेल्वे प्रशासनाला मदत झाली. तर शासनाकडून सुध्दा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सवलत दिली जात आहे.

सौर ऊर्जेतून बिरसी विमानतळ करणार २५ लाखांची बचत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या अनेक शासकीय कार्यालयांचा कल सौर ऊर्जेकडे वाढला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची बचत करणे देखील शक्य आहे. याच दृष्टीकोनातून गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाने १६० केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे विमानतळ प्राधिकरणाला वर्षाकाठी २५ ते ३० लाख रुपयांची बचत करणे शक्य होणार आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून येथील रेल्वे स्थानकावर सुध्दा सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे महिन्याकाठी लाखो रुपयांचा विजेवर होणार खर्च वाचविण्यास रेल्वे प्रशासनाला मदत झाली. तर शासनाकडून सुध्दा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सवलत दिली जात आहे. शिवाय सौर ऊर्जेचे अनेक फायदे असून अतिरिक्त वीज सुध्दा विद्युत वितरण कंपनीला विकणे शक्य आहे. याच पावलावर पाऊल ठेवित बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाचे सौरऊर्जेपासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेत १६० केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विमानतळाच्या परिसरात उभारला आहे.
या सौर प्रकल्पाचे नुकतेच क्षेत्रीय संचालक जी.चंद्रमोली यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बिरसी विमानतळावर दररोेज एअर ट्राफिक कंट्रोल युनिटसाठी दर महिन्याला लाखो रुपयांची वीज लागत होती. जवळपास वर्षाकाठी वीज बिलापोटी विमानतळ प्राधिकरणाला २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च करावा लागत होता.
या खर्चाची बचत करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. बिरसी विमानतळ परिसरात १६० केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पातून दररोज ८५० युनीट विजेचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे विमानतळ प्राधिकरणाची महिन्याकाठी २५ ते ३० लाख रुपयांनी बचत झाली आहे.
या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी विभागीय संचालक चंद्रमोळी यांच्यासोबत महाव्यवस्थापक जी.मनिष, विमानतळ प्राधिकरणाचे सचिन खंगार, सहायक व्यवस्थापक पकंज वंजारी व वरिष्ठ अधिकारी बुधवारी बिरसी येथे आले होते.