रिडिंग न घेताच पाठविले बिल
By Admin | Updated: March 2, 2015 01:36 IST2015-03-02T01:36:12+5:302015-03-02T01:36:12+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा-कोयलारी येथील कास्तकारांना रिडिंग न घेताच कृषी पंपाचे बिल अव्वाच्या सव्वा रूपयांचे पाठविण्यात आले.

रिडिंग न घेताच पाठविले बिल
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा-कोयलारी येथील कास्तकारांना रिडिंग न घेताच कृषी पंपाचे बिल अव्वाच्या सव्वा रूपयांचे पाठविण्यात आले. त्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शेतकऱ्यांत रोष व्याप्त आहे.
वीज वितरण कंपनीने रिडिंग न घेताच प्रत्येक कास्तकाराचा सारखाच वीज वापर दाखवून तीन हजारापासून ते दहा हजार रूपयांपर्यंतचे बिल पाठविले आहे. त्यामुळे कास्तकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही कास्तकारांना ३,९२५ युनिट वापर दाखवून तीन हजार रूपयांपासून दहा हजार रूपयांचे बिल पाठविले आहे. वीज वापर सारखाच दाखवून रकमेत फरक कसा? हा संशोधनाचा विषय आहे. याचाच अर्थ कार्यालयात बसून कृषी पंचाचे बिल तयार करण्यात आल्याचे बोलले जाते.
सध्या या परिसरात रब्बी धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. अशातच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बिल भरण्यासाठी कास्तकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. अन्यथा वीज जोडणी कापू, अशी धमकी देतात. अनेक कास्तकारांनी बिलाबाबत संबंधित अभियंत्याशी चर्चा केली. परंतु सदर बिल गोंदियावरून तयार होवून येतात. त्यात आमचा दोष नाही, असे सांगून हात वर करतात. पाठविलेले बिल भरा अन्यथा कनेक्शन कापन्याची धमकी देवून आल्यापावली परत पाठवितात, अशी तक्रार आहे.
वीज वितरण कंपनीच्या बाबतीत ही नवीन गोष्ट नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देताना दिसत नाही. अशातच कास्तकार आत्महत्यासारखे मार्ग स्वीकारून जीवनयात्रा संपवतात. त्यामुळे आत्महत्यांच्या प्रमाणातह सारखी वाढच होत आहे.
कृषी पंपाची रिडिंग घेऊन जर बिल पाठविले तर आम्ही हमखास बिल भरू. मात्र विनारिडिंग अव्वाच्या सव्वा बिल पाठविण्यात आले तर हे सहन करणार नाही, असे अनेक कास्तकारांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)