भीमनगर व सिव्हील लाईन्सची योजना रखडली
By Admin | Updated: November 23, 2014 23:21 IST2014-11-23T23:21:16+5:302014-11-23T23:21:16+5:30
शहराला २४ तास पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगत सुरू करण्यात आलेली वाढीव पाणी पुरवठा योजना फसली आहे. शहरात या योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या तीन पैकी फक्त एकाच

भीमनगर व सिव्हील लाईन्सची योजना रखडली
गोंदिया : शहराला २४ तास पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगत सुरू करण्यात आलेली वाढीव पाणी पुरवठा योजना फसली आहे. शहरात या योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या तीन पैकी फक्त एकाच टाकीतून पाणी पुरवठा सुरू झाला असून अन्य दोन टाक्या शोभेच्या ठरत आहेत. तर अधिकारी देत असलेले आश्वासनही फसवे ठरत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही याच अधिकाऱ्यांनी आता पुन्हा एका आठवड्याचा अंदाज वर्तवून वेळ मारून नेली आहे.
वाढीव पाणी पुरवठा योजनेचे गाजर दाखवित शहरात चांगलेच राजकारण झाले. मागील वर्षभरापेक्षा जास्त काळापासून शहरवासीयांना या योजना काही दिवसांत सुरू होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप या योजनांचा मुहूर्त निघालेला नाही. वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरातील सिव्हील लाईंस विवेकानंद कॉलनीत ३१.३५ लाख लीटर, भीमनगर येथे २१.३५ लाख लीटर तर रामनगर येथे १२.९० लाख लीटर क्षमतेच्या तीन टाक्या बांधण्यात आल्या. मात्र यातील फक्त रामनगर मधील योजनाच सुरू झाली असून यातून पाणी पुरवठा सुरू आहे.
तर उर्वरीत सिव्हील लाईंस विवेकानंद कॉलनी व भिमनगर मधील दोन्ही योजना अडकून पडल्या आहेत. विशेष म्हणजे विवेकानंद कॉलनीच्या योजनेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे उप कार्यकारी अभियंता विवेक बन्नोरे यांना मागील महिन्यात विचारले असता त्यांनी विद्युत विभागाच्या काही सूचनांची पूर्तता केल्यानंतर १० नोव्हेंबरपर्यंत पाणी पुरवठा सुरू करणार असे सांगितले होते. मात्र त्यांनी दिलेली तारीख निघून गेली असून आजपर्यंत ही योजना सुरू झालीच नाही. हाच प्रकार भिमनगरच्या योजनेसोबत घडला आहे.
हा प्रकार पहिल्यांदा घडला असे नाही. तर मागील वर्ष भरात कित्येक तारखा सांगण्यात आल्या मात्र या योजनांतून पाणी पुरवठा सुरू करण्याचा मुहूर्त मात्र विभागाला सापडला नसल्याचे दिसते. येथे खास बात अशी की, या योजनांबद्दल विचारणा केली असता त्यांनी पुन्हा एका आठवड्याचा अंदाज वतर्विला आहे. मागील वर्षभरापासूनचा हा खेळ आता तरी थांबतो काय असा सवाल येथे येथील रहिवाशांना पडला आहे. अशात आता एका आठवड्यात या योजनांतून पाणी पुरवठा सुरू होतो की पुन्हा हवा निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)