बेस्ट पोलिस स्टेशन अवाॅर्ड गोज टू अर्जुनी मोरगाव; राज्यात चौथ्या स्थानी
By नरेश रहिले | Published: July 6, 2023 06:50 PM2023-07-06T18:50:26+5:302023-07-06T18:50:56+5:30
Gondia News गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
नरेश रहिले
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. सन २०२१ मध्ये अर्जुनी-मोरगावचे तत्कालीन ठाणेदार व सध्या गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या कुशलतेमुळे हा सन्मान जाहीर झाला आहे. येत्या सोमवारी त्यांना हा सन्मान मुंबई येथे पोलिस महासंचालकांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
सन २०१६ मध्ये झालेल्या परिषदेत निकोप स्पर्धा वाढावी, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची ‘बेस्ट पोलिस स्टेशन’ म्हणून निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड भारत सरकार, गृह मंत्रालयाकडून करण्यात येते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आला. सन २०२० या वर्षापासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची निवड करून या पोलिस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.
निवड समितीत यांचा समावेश
त्याच धर्तीवर सन २०२१ या वर्षातील कार्यमूल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेकरिता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली यांची बारकाईने तपासणी करून सर्व पोलिस ठाण्यांचे मूल्यमापन करून त्यापैकी २ उत्कृष्ट पोलिस ठाणी निवडण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती, परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त यांनी घटकनिहाय, परिमंडळनिहाय प्राप्त प्रत्येकी दोन पोलिस ठाण्यांमधून परिक्षेत्र, आयुक्तालय स्तरावर उत्कृष्ट दोन पोलिस ठाण्यांची निवड करण्यासाठी परिक्षेत्रीय स्तरावर समिती आणि परिक्षेत्रनिहाय व आयुक्तालयनिहाय प्राप्तः उत्कृष्ट पोलिस ठाण्यांमधून ५ सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणी निवडण्यासाठी राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आल्या होत्या.
पाेलिस अधीक्षकांनी दिली कौतुकाची थाप
सन २०२१ या वर्षातील कार्यमूल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्रनिहाय व आयुक्तालयनिहाय प्राप्त उत्कृष्ट पोलिस ठाण्यांमधून सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केली होती. सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून घोषित करण्यात आलेल्या अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यातील ठाणेदार व कर्मचाऱ्यांचे कौतुक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.
ही पोलिस ठाणी सर्वोत्कृष्ट
राज्यात पहिल्या क्रमांकावर शिवाजीनगर पोलिस ठाणे (कोल्हापूर), दुसऱ्या क्रमांकावर देगलुर पोलिस ठाणे (नांदेड), तिसऱ्या क्रमांकावर वाळुंज पोलिस ठाणे (छत्रपती संभाजीनगर शहर), चौथे अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे (गोंदिया) व पाचवे राबोडी पोलिस ठाणे (ठाणे शहर) अशा पाच पोलिस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून राज्य स्तरावरील समितीने घोषित केले आहे.
या निकषांच्या आधारावर पुरस्कार
राज्यातील पोलिस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलिस अधिकारी, अंमलदार यांना प्रोत्साहित करणे या निकषांमुळे अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे राज्यात चौथ्या क्रमांकावर आले आहे.