तळागाळातील लोकांना द्या योजनांचा लाभ- बन्सोड
By Admin | Updated: October 29, 2015 00:16 IST2015-10-29T00:16:29+5:302015-10-29T00:16:29+5:30
स्थानिक तहसील कार्यालयामार्फत शासकीय विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.

तळागाळातील लोकांना द्या योजनांचा लाभ- बन्सोड
तिरोडा : स्थानिक तहसील कार्यालयामार्फत शासकीय विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. त्याचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतो काय? याचा आढावा घेण्यासाठी माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोरकुमार पारधी, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, जि.प. सदस्य प्रिती रामटेके, सुनील मडावी, माजी पं.स.सदस्य संजय किंदरले यांचे शिष्टमंडळाने तहसीलदार रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली.
तहसीलदार यांच्या अनुमतीने पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकारांना कार्यालयाच्या दालनात बोलावून माजी आ. दिलीप बन्सोड यांनी श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, सामाजिक सुरक्षा योजना, अर्थसहाय्यक योजना, धानाची आणेवारी, करताना विभागातील पदाधिकारी यांना माहिती देणे व निश्चित करणे, धानावर किड लागल्याने सवेक्षर्ण करणे व नुकसान भरपाई देणे, गॅसधारकांना रॉकेल देणे, दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना इतर योजनांकरिता उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढणे या सर्व बाबीची पूर्तता एका महिन्यात करण्यात यावी, याचा आढावा पुढील महिन्यात घेण्यात येईल असे ठरले. यावेळी पंचायत ससमितीचे सभापती, उपसभापती व सदस्य तसेच जि.प.सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पं.स.सभापतीने आपल्या मासिक सभा दरमहा लवकर आटोपून या तहसील कार्यालयात येऊन याचा आढावा घ्यावा. शासकीय नियमानुसार तहसीलदारांनी त्यांच्याशी सन्मानाने वागावे असेही यावेळी बन्सोड यांनी सांगितले. यावेळी संजय किंदरले, मुकेश बरियेकर, जि.प. व पं.स. सदस्यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली. विचारलेल्या प्रश्नांची तहसीलदारांनी सकारात्मक उत्तरे देऊन एका महिन्यात त्याचा निकाल लावण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या दलालांची सुट्टी होईल. (शहर प्रतिनिधी)