पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा शेकडो युवक घेताहेत लाभ
By Admin | Updated: June 6, 2014 00:04 IST2014-06-06T00:04:24+5:302014-06-06T00:04:24+5:30
सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही नोकरी मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले, मुली विविध प्रकारे परिश्रम घेत असतात. परंतू अनेकदा त्यांचा टिकाव लागत नाही.

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा शेकडो युवक घेताहेत लाभ
अर्जुनी/मोरगाव : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही नोकरी मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले, मुली विविध प्रकारे परिश्रम घेत असतात. परंतू अनेकदा त्यांचा टिकाव लागत नाही. मात्र पोलीस भरतीमधील शारीरिक क्षमता चाचणीत आपण नक्कीच उत्तीर्ण होऊ असा विश्वास आता शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना वाटत आहे.
या बेरोजगार युवकांसाठी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या आवारात नि:शुल्क शारीरिक प्रशिक्षण दिले जात आहे. स्पर्धेत टिकून राहावे यासाठीचा अभ्यास तथा पोलीस व सेनेमध्ये नोकरी मिळण्यासाठी ते विविध कसरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील मुलामुलींना पोलीस किंवा सेनेमध्ये नोकरी मिळविण्यासाठी सन २00९ पासून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा हा उपक्रम राबविला जात असून त्याचे आता फलित होण्याची आशा निर्माण झाली आहे.
पोलीस हवालदार रमेश खंडाते हे पूर्वी १९९३-९४ या कालावधीत भंडारा-गोंदिया पोलीस मुख्यालयात कवायत निर्देशक म्हणून काम करीत होते. पोलीस विभागात नव्याने नियुक्त झालेल्या जवानांना सुध्दा त्यांनी प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. खंडाते हे सन २00९ ला अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये बदलून आले. तेव्हापासून त्यांनी तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरूण/तरूणींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे या सामाजिक भावनेतून त्यांनी प्रशिक्षण शिबीर सुरू करून शेकडो तरूण/तरुणींना प्रशिक्षित केले आहे. आज त्यांच्या प्रशिक्षणामुळे तालुक्यातील ५0 ते ६0 मुले/मुली पोलीस विभाग, एसआरपी, सीआरपी, बीएसएफमध्ये नोकरीला लागले आहेत.
सध्या पोलीस भरतीची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाला आणखीच महत्व आले आहे. आपल्या पोलीस स्टेशनची नियमित ड्युटी कार्य आटोपून खंडाते हे सामाजिक दायित्व ठेवून तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देत आहेत.
देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी अर्जुनी/मोरगावचे पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली असता, पोलीस हवालदार रमेश खंडाते यांच्या या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देवून त्यांना प्रोत्साहित करून सदर विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचना करून आपणही स्वत: मार्गदर्शन केले. राजमाने तथा अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांचे मार्गदर्शनात खंडाते हे शेकडो मुला/मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देत आहेत.
या प्रशिक्षणात शारीरिक व्यायाम, दोन टप्यातील रनिंग, गोळा फेक, लॉग जम्प, पुलप्स अशा विविध कसरतीचे प्रशिक्षण दिले जाते. या कामासाठी पोलीस हवालदार दिवाकर शहारे सुध्दा त्यांना मदत करीत असल्याचे खंडाते यांनी सांगितले. या कसरतीच्या प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची तयारीसुध्दा पोलीस हवालदार अंबादास थोरात करून घेत आहे. हे सर्व सामाजिक उपक्रम आपण वरिष्ठांच्या प्रोत्साहनामुळे पूर्ण करीत असतो, असेही खंडाते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)