एकाच लाभार्थीला दोन वेळा दिला लाभ
By Admin | Updated: November 20, 2014 22:55 IST2014-11-20T22:55:16+5:302014-11-20T22:55:16+5:30
गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सोनपुरी ग्राम पंचायतचे इंदिरा आवास योजनेंतर्गत एकाच लाभार्थीला दुसऱ्यांदा घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एकाच लाभार्थीला दोन वेळा दिला लाभ
परसवाडा : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सोनपुरी ग्राम पंचायतचे इंदिरा आवास योजनेंतर्गत एकाच लाभार्थीला दुसऱ्यांदा घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात सरपंच व ग्रामसेवक एस.एस.गौतम यांनी चिरमिरी घेतल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे.
इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अतीगरजू, गरीब, भूमिहिन, ज्यांचे घरच नाही व घर जीर्ण असून ज्यांची घर बांधणीची क्षमता नाही अशांची यादी ग्रामसभा घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करुन पंचायत समितीला पाठविली जाते. पण यादीत २००२ मध्ये ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला त्यांची नावे दुसऱ्यांदा समाविष्ट करून पाठविण्यात आली.
सन २०१३-१४ मध्ये ८६ लाभार्थीची यादी पाठविण्यात आली. त्यात ८१ बी.पी. एल. सर्वसाधारण व पाच अनु. जातीचे असून काही लाभार्थ्यांना २००५-०६ च्या इंदिरा आवास प्रतीक्षा यादीतूनही लाभ मिळाला आहे. त्यांचे नाव वगळणे व यादीतुन कमी करणे हे ग्रामसेवक गौतम यांचे काम होते. पण त्यांनी वगळले नाही परिणामी त्यांना दुसऱ्यांदा योजनेचा लाभ मिळाला असून घरकुलांचे आजघडीला काम सुरु आहे. अशांत सुरज पोतण पटले सोनपुरी (पोलटोला) बीपीएल क्र. १०, देबीलाल पोतन पटले बीपीएल -१८, नानाजी शिवदास वैद्य (चन्नदाबाई)बीएल क्र. ९८, राधेलाल चरण कोहरे-बपीएल क्र.६३, सुभाष हरिदास मेश्राम बीपीएल -९५, नरेंद्र बिसराज वैद्य-बीपीएल-९२, धनीराम गरीबा वैद्य (कोसल्या) बीपीएल क्र.८७, हरतीमा मोतीराम मेश्राम बीपीएल क्र. ८८, बसतराम मोहणलाल बीपीएल क्र. १४,धनराज रघुनाथ आडकने बीपीएल -५० यांचा समावेश आहे.
यांच्यासाठी मात्र संजय हरिचंद उके बीपीएल क्र. ६९, नत्थु काशीराम चौरागडे,बीपीएल क्र. ६२, गुणराज भीवाजी नेवारे,बीपीएल क्र.-४१ या अती गरजू, गरीत व बेघरांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले. याप्रकरणी ग्रामसभेत व मासीक सभेत ग्रां.प. सदस्य नटवरलाल गुजलाल जैतवार यांनी प्रश्न उपस्थित केला असता गौतम यांनी उत्तर दिले नाही. उलट सभा लवकरच गुंडाळून ते वरिष्ठांचे नाव सांगून निघून गेले.
घरकुल योजनेत सरपंच व ग्रामसेवक यांनी यादीतील प्रत्येक लाभार्थ्यांकडून १० हजार रुपये घेऊन त्यांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप जैतवार यांनी केला आहे. तशी तक्रार खंडविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना केली आहे. संबंधित कर्मचारी अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाहीची मागणी जैतवार यांनी केली आहे. कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याप्रकरणी ग्रामसेवक गौतम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. शिवाय ते गावात आठवड्यातुन एकदा येत असल्याचे जैतवार यांनी सांगितले. (वार्ताहर)