ही खरी परिवर्तनाची नांदी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:32+5:302021-02-10T04:29:32+5:30
गोंदिया : महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. येथे आयोजित कार्यक्रमामध्येही सर्वाधिक सुवर्णपदके मुलींनीच प्राप्त ...

ही खरी परिवर्तनाची नांदी ()
गोंदिया : महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. येथे आयोजित कार्यक्रमामध्येही सर्वाधिक सुवर्णपदके मुलींनीच प्राप्त केली आहेत. मुली या शिक्षणातही अग्रेसर असून, मुलांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. मुलींची दिवसागणिक होत असलेली प्रगती ही खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा जागर आणि परिवर्तनाची नांदी असल्याचे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
गोंदिया शिक्षण संस्था, मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गुजराती राष्ट्रीय केलवनी मंडळाच्या वतीने स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक वितरण सोहळा स्थानिक नमाद विद्यालयाच्या ऑडिटोरियम सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, सहषराम कोरोटे, डॉ. नामदेव उसेंडी, नरेंद्र भोंडेकर, अभिजित वंजारी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, विलास श्रृंगरपवार, अनिल बावनकर, के. आर. शेंडे, विजय शिवणकर उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, देशाने सर्वच क्षेत्रांत प्रगती केली असून महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच भारताचे नाव आदराने घेतले जाते. जगसुद्धा वेगाने बदलत असून त्याच वेगाने आपल्यालाही बदलण्याची गरज आहे. देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
......
प्रफुल्ल पटेलांमुळे गोंदियाला येण्याचा योग
मी संघ प्रचारक म्हणून काम करीत असताना अनेक देश-विदेशांत फिरलो. संघप्रचारक म्हणून कार्य करीत असताना गोंदिया येथील संघप्रचारक विश्वनाथ लिमिये यांनी अनेकदा मला आपल्याला गोंदियाला येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र प्रत्यक्षात येण्याची संधी आली नव्हती. मात्र खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जयंती कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिल्याने गोंदियाला येण्याची इच्छा पूर्ण झाल्याची ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.
.......
विकासाच्या मुद्द्यावर आपण सर्वांसोबत - प्रफुल्ल पटेल
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विकासकामे करीत असताना आपण त्यात कधीच राजकारण आणण्याचा प्रयत्न केला नाही. तसे संस्कारही आपल्यावर झाले नाहीत. दोन्ही जिल्ह्यांत विकासकामे करताना सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीच आपली भूमिका सदैव राहिली. विकासाच्या मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नये, असा सल्लाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.
......