गादबोडीचे खोलीकरण सुरू
By Admin | Updated: April 23, 2017 01:47 IST2017-04-23T01:47:34+5:302017-04-23T01:47:34+5:30
गावातील मजुरांना गावामध्येच काम उपलब्ध करुन देऊन त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटावा या हेतूने

गादबोडीचे खोलीकरण सुरू
रोजगार हमी योजना ठरली वरदान : ७०० मजुरांच्या हातांना मिळाले काम
बोंडगावदेवी : गावातील मजुरांना गावामध्येच काम उपलब्ध करुन देऊन त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटावा या हेतूने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. उन्हाची दाहकता तीव्र असली तरी ‘ पोटासाठी वाटेल ते’ यानुसार गावातील शेकडो मजुरांनी शनिवारी (दि.२२) रोहयोच्या कामावर हजेरी लावून गादबोडीच्या खोलीकरणाचा शुभारंभ केला. या कामावर ७०० मजूर काम करीत असून विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती दुप्पटीने जास्त दिसत होती.
ग्रामपंचायतच्यावतीने दुसऱ्या टप्प्यातील रोजगार हमी योजनेच्या सुरू झालेल्या कामावर पहिल्याच दिवशी मजुरांची विक्रमी उपस्थिती दिसून आली. गावातील गट नंबर १६१ मधील गादबोडीच्या खोलीकरणाचे काम रोहयोच्या माध्यमातून करण्याचा शुभारंभ करण्यात आला. रोहयोच्या कामाची मागणी करण्यासाठी गावातील एक हजार सात मजुरांच्या नावाची नोंदणी करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक एल.एम. ब्राम्हणकर यांनी दिली. सदर बोडीच्या खोलीकरणाच्या कामावर १५ लाख ९८ हजार २४० रुपयांचा निधी खर्चीला जाणार असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले.
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. तळपत्या उन्हाने जिवाची लाई-लाई होत असून सुद्धा गादबोडी खोलीकरणाच्या कामावर पहिल्याच दिवशी २४२ पुरुष व ४६१ महिला असे ७०३ मजूर काम करीत असल्याचे ग्राम रोजगार सेवक सचिन नाकाडे यांनी सांगितले. सदर बोडी खोलीकरणाच्या कामामुळे गावातील समस्त लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या कामामुळे गावातील मजुरांना गावामध्ये रोजगाराची संधी मिळाली. बोडी खोलीकरणामुळे तलावातील पाण्याच्या जलसिंचित साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार यात शंका नाही. सदर बोडीमध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढल्यास जवळच्या शेतकऱ्यांना धान उत्पादन व ईतर पिकांसाठी सहजरित्या पाणी उपलब्ध होणार अशी शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे.
त्याचबरोबर भोई समाज बांधवांना तलावात मत्स्यव्यवसाय करण्यासाठी संधी सुद्धा मिळू शकते. (वार्ताहर)
रोजगार हमीच्या कार्याला ‘प्रथम’ पसंती
गावागावात सुरू होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामाला गावकरी प्रथम पसंती देत असल्याचे रोहयोच्या मजुरांच्या विक्रमी उपस्थितीवरुन सर्वत्र दिसून येत आहे. रोहयोच्या कामाच्या ठिकाणी फेरफटका मारला असता कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्य कामाच्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असल्याचे दिसून आले. बारमाही रोजी करणारा त्या कामावर तर दिसलाच परंतु जे कोणी घरच्या कामाशिवाय इतर कामाला शिवत नाही, अशांची संख्या नजरेत भरणारी दिसत होती. काही हौशीखातर म्हणूनही आपली हजेरी लावण्याचा प्रकार करीत असल्याची कुजबुज ऐकायला मिळत होती. लोकांची रोहयोच्या कामाला प्रथम पसंती दिसते.