धरणे आंदोलनकर्त्यांवर मधमाशांचा हल्ला
By Admin | Updated: March 7, 2017 00:56 IST2017-03-07T00:56:06+5:302017-03-07T00:56:06+5:30
आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले.

धरणे आंदोलनकर्त्यांवर मधमाशांचा हल्ला
जीवन प्राधिकरण : पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता
गोंदिया : आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले. दरम्यान तिथे असलेल्या पाण्याच्या टाकीवरील मधमाशांचे पोळ उठले आणि मधमाशांनी या कर्मचाऱ्यांच्या दिशेने मोर्चा वळविला. त्यामुळे घाबरलेले अधिकारी कर्मचारी पेंडॉल सोडून आपल्या कार्यालयात दार बंद करून बसले. या गडबडीत दोन कर्मचारी जखमी झाले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी-कर्मचारी आपल्या वेतन-भत्त्याचे अनुदान शासनाकडून मिळविण्याच्या मागण्यांसाठी ४ मार्चपासून धरणे आंदोलन करीत आहेत. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर कार्यालयात आंदोलनात सहभागी होण्यासाठी सामूहिक रजा घेतली आहे.
गोंदिया येथील मजीप्रा कार्यालयासमोर ५ मार्चपासून पेंडाल घालून सर्व कर्मचारी बसले होते. तेवढ्यात अचानक दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मधमाशांच्या एका समुहाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले. तर उर्वरित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरातच तीन उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता व बिल भरण्याचे कार्यालय आहे. या सर्व कार्यालयांचे बंद दार-दरवाजे उघडण्यात आले व सर्व अधिकारी कर्मचारी जवळपास एक तासपर्यंत त्यात लपून राहिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा सदर पेंडालमध्ये आपली उपस्थिती लावणे सुरू केले. पुन्हा मधमाशांनी येणे सुरू केले, त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांना कार्यालयात आश्रय घ्यावा लागला. त्यामुळे पेंडॉल सामसूम होता.
सध्या या आंदोलनात निशीकांत ठोंबरे, राजेंद्र मडके, प्रदीप वानखेडे, विकास दिवारे, आर.एन. खैरे, जी.पी. खापेकर, जी.यू. धारकर, पी.एम. वाघाये, आर.वी. चौडलवार, भरत परतेती, अनूप निमजे, बी.एन. रामटेके, एन.जी. अरखेल, एच.के. नागपुरे, एन.एम. सैयद, जे.डी. लिल्हारे, आर.सी. चित्रीव, एन.एन. देशमुख, पी.जी. बिसने, जी.यू. सुपारे, रविकांता डोंगरे व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पाणी पुरवठ्यावर परिणामाची शक्यता
मजीप्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी १ ते ५ मार्चपर्यंत कार्यालयात काळ्या फिती लावून काम करीत होते. ५ मार्चच्या पहाटे १ वाजतापासून कामबंद आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात सर्व अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प होण्याची शक्यता होती. ५ मार्चच्या सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही, अशी शक्यता वाढली होती. परंतु रात्री ९ वाजतादरम्यान पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. या संदर्भात मजीप्राचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांनी सांगितले की, संघटनेच्या वतीने कसलीही सूचना प्राप्त झालेली नाही.
माजी आमदारांचे समर्थन
आंदोलनकर्त्यांच्या पेंडॉलमध्ये तिरोडा येथील माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी सोमवारी जाऊन मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना आपले समर्थन जाहीर केले. यादरम्यान त्यांनी आंदोलनाच्या संदर्भात कर्मचाऱ्यांकडून माहितीही जाणून घेतली.