सावधान ! सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांना बसणार दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:55+5:302021-03-31T04:28:55+5:30
बोलताना आपल्या तोंडातून निघणाऱ्या तसेच शिंकताना व खोकलताना उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. यावर नियंत्रण म्हणूनच ...

सावधान ! सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांना बसणार दणका
बोलताना आपल्या तोंडातून निघणाऱ्या तसेच शिंकताना व खोकलताना उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. यावर नियंत्रण म्हणूनच तोंडावर मास्क लावायला सांगितले जात आहे; मात्र जिल्ह्यात कोरोनाचा भडका उठत असतानाही कित्येक नागरिक मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. एवढेच काय तंबाखू व गुटखा खाऊन रस्त्यांवर सर्रास थुंकताना कित्येकांना बघितले जात आहे. विशेष म्हणजे, चालत्या गाडीवरून थुंकणाऱ्यांमुळे मागून येणाऱ्यांवर त्यांची थुंकी उडते. हा प्रकार सर्वाधिक धोकादायक आहे; मात्र यावर काहीच नियंत्रण नसल्याने बेजबाबदार नागरिकांचे हे वर्तन सुरूच आहे.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, त्यातही राज्यात सर्वाधिक कहर सुरू आहे. आता परिस्थिती हाताबाहेर निघत असताना ती नियंत्रणात आणण्यासाठी शासन व प्रशासनाची धडपड सुरू आहे. अशात मुख्यमंत्र्यांनी मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपये तर सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. आता खुद्द मुख्यमंत्र्यांचे हे आदेश असल्याने अवघ्या राज्यातच त्याची अंमलबजावणी केली जाणार, यात शंका नाही. त्यामुळे सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांसाठी त्यातही गुटखा व तंबाखू खाणाऱ्यांची या आदेशानंतर चांगलीच अडचण होणार आहे; मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आदेश महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
-------------------------
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आता त्यांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आदेश काढतील व त्यांच्या आदेशाचीच वाट आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका वाढत असतानाचा चालत्या वाहनावरून थुंकणाऱ्यांमुळे नागरिकांच्या अंगावर थुंकी उडत असल्याचा गलिच्छ प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहे. अशांवर दंडासोबतच अन्य कठोर शिक्षेचीही तरतूद करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.