सावधान! हे सायलेन्स झोन आहे
By Admin | Updated: August 6, 2015 00:42 IST2015-08-06T00:42:32+5:302015-08-06T00:42:32+5:30
दिवसेंदिवस वाढत असलेले ध्वनी प्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होत असलेला दुष्परिणाम आता एक समस्या झाली आहे.

सावधान! हे सायलेन्स झोन आहे
न.प.कडून क्षेत्र निश्चित - कर्णकर्कश आवाजांपासून मिळणार दिलासा
गोंदिया : दिवसेंदिवस वाढत असलेले ध्वनी प्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होत असलेला दुष्परिणाम आता एक समस्या झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोंदिया नगर परिषदेने शहरातील सायलेन्स झोन जाहीर केले. शहरातील तीन भाग वाटून त्यात ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील ठरणाऱ्या ३० स्थळांना ‘सायलेन्स झोन’ घोषित केले आहे. या परिसरात आता ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा मोठ्या आवाजात डिजे, बँड किंवा इतर प्रकारच्या कोणत्याही साधनांद्वारे आवाजाची मर्यादा ओलांडता येणार नाही. या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
वातावरणातील प्रदूषणाचे परिणाम आरोग्यावर जाणवत असतानाच ध्वनी प्रदूषणाची त्यात भर पडत असल्याने याबाबत थेट उच्च न्यायालयानेच निर्देश दिले आहेत. कर्णकर्कश आवाजामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीयदृष्टयाही आता सिद्ध झाले आहे. मात्र मानवाकडूनच होत असलेल्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे मानवाच्याच अखत्यारित राहिले नसल्याने आता या विषयाला चक्क उच्च न्यायालयाला हाताळण्याची पाळी आली.
न्यायालयाने नगर पालिकांना पत्र पाठवून शहरातील विशिष्ट परिसरांना सायलेन्स झोनमध्ये टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने शहरात शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, मार्केट परिसर व रूग्णालय परिसराला सायलेंट झोनमध्ये टाकले आहे. गोंदियातील अशा ३० ठिकाणांचा यात समावेश करण्यात आला आहे.
याबाबत गोंदिया पालिकेने नगर पालिका प्रशासन संचालनालयाकडे अहवाल पाठविला आहे. विशेष म्हणजे उपरोक्त घोषित शांतता क्षेत्राकरिता ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा २००० नुसार जे ध्वनी प्रदूषण निकष निश्चित करण्यात आले आहे, ते निकष तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)
ही ठिकाणे आहेत सायलेन्स झोनमध्ये
गोंदिया शहरातील सायलेन्स झोनमध्ये ३० ठिकाणांचा समावेश केला आहे. त्यात शैक्षणिक संस्थांमध्ये एनएमडी कॉलेज परिसर, डीबी सायंस कॉलेज, बीएचजे कॉलेज, पी.पी.कॉलेज, सिंधी हायस्कूल, राजस्थान कन्या विद्यालय, गुरूनानक हायस्कूल, मारवाडी हायस्कूल, गर्ल्स विद्यालय व महाविद्यालय, मनोहर म्युनिसिपल हायस्कूल, गुजराती हायस्कूल, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल, जे.एम.हायस्कूल, नगर परिषद गोविंदपूर प्राथमिक स्कूल, निर्मल स्कूल, आझाद उर्दु स्कूल, मरारटोली प्राथमिक स्कूल परिसराचा समावेश आहे. शासकीय कार्यालय परिसरात- नगर परिषद कार्यालय परिसर, तहसील कार्यालय, जिल्हा न्यायालय, पोलीस निरीक्षक कार्यालय, पोस्ट आॅफिस कार्यालय, वनविभाग कार्यालय व पंचायत समिती कार्यालय परिसराचा समावेश आहे. रूग्णालयांत जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर, बीजीडब्ल्यू रूग्णालय, गाडेकर हॉस्पिटल, गोंदिया केअर हॉस्पीटल, डॉ.ओझा हॉस्पीटल व गोंदिया हॉस्पीटल परिसराचा समावेश आहे.
मिरवणुकांतील डिजेवर येणार बंधन
गोंदियात अनेक धार्मिक उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात डिजे लावून कर्णकर्कश आवाजात सिनेमाची गाणी वाजविली जातात. याचा त्रास व्यापारी वर्गासह रुग्णांना होत असूनही आतापर्यंत कधीही कारवाईसाठी धजावले नाही. पण आता पोलिसांना संबंधितांवर कारवाई करावी लागणार आहे.
शहरात ठरवून देण्यात आलेल्या या ठिकाणंवर नगर पालिकेच्या आरोग्य विभागातील पर्यवेक्षक नजर ठेवणार आहेत. त्यांच्या भागात त्यांना कायद्याचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे प्रकार दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.