सावधान ! आता निष्काळजीपणा नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:07+5:30
कोरोनाने पुन्हा एकदा आपला उद्रेक सुरू केला आहे. विशेष म्हणजे, देशात कोरोना शिरल्यापासूनच राज्यात सर्वाधिक कहर केला आहे. तोच प्रकार सध्या पुन्हा एकदा बघावयास मिळत आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे, विदर्भात कोरोनाने नको तेवढा कहर केला असून याला नागरिकांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच केंद्रीय समितीने विदर्भाला सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

सावधान ! आता निष्काळजीपणा नकोच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवघ्या राज्यातीलच परिस्थिती आता दिवसेंदिवस गंभीर चालली असून कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊनची पाळी आली आहे. तर, जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून ही धोक्याची सूचना आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर काही दिवसांनी जिल्ह्यात त्याचे पडसाद दिसून येत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सावधान होण्याची गरज असून आता निष्काळजीपणा परवडणारा ठरणार नाही.
कोरोनाने पुन्हा एकदा आपला उद्रेक सुरू केला आहे. विशेष म्हणजे, देशात कोरोना शिरल्यापासूनच राज्यात सर्वाधिक कहर केला आहे. तोच प्रकार सध्या पुन्हा एकदा बघावयास मिळत आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे, विदर्भात कोरोनाने नको तेवढा कहर केला असून याला नागरिकांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच केंद्रीय समितीने विदर्भाला सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचा उद्रेक आता नागपूरपर्यंत आला असून सोमवारपासून नागपूरमध्ये लॉकडाऊन केले जाणार आहे. तर, आता जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
विशेष म्हणजे, नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जिल्ह्यात उद्रेक होताे, असे आरोग्य विभागाच्या अभ्यासात बघावयास मिळाले आहे. म्हणजेच, आता नागपूरमध्ये कोरोना तांडव करीत असतानाच जिल्हावासीयांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
ज्या प्रकारे नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे व तेथे लॉकडाऊन केले जाणार. त्याप्रकारे जिल्ह्यात आतापासूनच नागरिकांनी खबरदारी घेतल्यास कोरोनाला परतावून लावता येणार आहे. मात्र, यासाठी आता नागरिकांनीx गाफील न राहता उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची खरी गरज आहे.
लॉकडाऊन टाळण्यासाठी नियमांचे पालन करा
नियंत्रणात असलेला कोरोना आपले रूप पुन्हा एकदा दाखवून देत आहे. नागपूर व त्यापुढे कोरोनाने तांडव सुरू केले असून कित्येकांचा जीव जात असून हजारोंच्या संख्येत बाधित वाढत आहेत. उपाययोजनांकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षाचे हे परिणाम आता जाणवू लागले असून कित्येक जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. मात्र, जिल्ह्याला आता लॉकडाऊन परवडणारे नसून लॉकडाऊन टाळायचे असल्यास नियमांचे पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. यामुळेच आता जिल्हावासीयांनी कोरोना विषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनानेही आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच राबविण्याची गरज आहे.