सावधान ! जिल्हावासीयांनो अधिक सतर्कतेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:25+5:302021-02-10T04:29:25+5:30
गोंदिया : नवीन वर्षात कोरोनाचा उद्रेक कमी होत असल्याचे दिसत असून, यात जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची ...

सावधान ! जिल्हावासीयांनो अधिक सतर्कतेची गरज
गोंदिया : नवीन वर्षात कोरोनाचा उद्रेक कमी होत असल्याचे दिसत असून, यात जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पूर्वीच्या तुलनेत चांगलीच नियंत्रणात आली आहे. असे असतानाच विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकाने जिल्ह्यासह अवघ्या विदर्भाची धडकी वाढवत अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावरून जिल्हावासीयांनी आता कोरोना गेल्याचा भ्रम न बाळगता अधिक सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजनांचे पालन करण्याची गरज दिसून येत आहे.
नववर्षात लस आली व सुदैवाने सोबतच बाधितांचे आकडेही कमी होताना दिसत आहे. मात्र, जिल्ह्याची स्थिती बघता कोरोना बाधितांची दररोजची आकडेवारी कमी - जास्त होत आहे. विशेष बाब म्हणजे, सोमवारी (दि. ८) जिल्ह्यात बाधितांची भर पडली असतानाच कोरोनावर मात करणारा एकही नव्हता. शिवाय कधी-कधी बाधित जास्त व कोरोनावर मात करणारे कमी अशी स्थितीही बघावयास मिळत आहे. यावरून कोरोना मधामधात झटके देत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकानेही याची पुष्टी केली असून, अधिक सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
-------------------------------------
मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईची गरज
कोरोना नियंत्रणात असल्याचा अर्थ जिल्हावासीयांनी कोरोना पूर्णपणे गेला असा काढला आहे. यामुळेच आता विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या अधिक, तर मास्क लावणारे मोजके अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दुसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांना मास्क लावणे व शारीरिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असल्याचे आदेश काढले आहेत. मात्र, मास्क व शारीरिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवरील कारवाई पोलिसांनी पूर्णपणे बंद केल्याने नागरिक अधिक गब्बर झाले आहेत. अशात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कारवाईची गरज असल्याचे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.