पंकज यादववरील हल्ल्यामागे राजकीय वर्चस्वाची लढाई
By Admin | Updated: March 25, 2015 01:20 IST2015-03-25T01:20:11+5:302015-03-25T01:20:11+5:30
नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता पंकज यादव यांच्यावर आठ दिवसांपूर्वी झालेला हल्ला हा राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून झाला असून यामागील ‘मास्टरमाईंड’ दुसराच आहे.

पंकज यादववरील हल्ल्यामागे राजकीय वर्चस्वाची लढाई
गोंदिया : नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता पंकज यादव यांच्यावर आठ दिवसांपूर्वी झालेला हल्ला हा राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून झाला असून यामागील ‘मास्टरमाईंड’ दुसराच आहे. पोलिसांनी त्या मास्टरमाईंडला शोधून काढावे, अशी मागणी पंकज यादव यांचे कनिष्ठ बंधू नगरसेवक कल्लू उर्फ लोकेश यादव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली.
मंगळवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या घटनेमागील पार्श्वभूमी सांगितली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिव शर्मा, न.प.चे माजी उपाध्यक्ष भगत ठकरानी, बजरंग दलाचे सागर सिक्का, पुरनलाल यादव, राजकुमार यादव आदी उपस्थित होते.
लोकेश यादव म्हणाले, गोंदियात गेल्या अनेक दिवसांपासून डुकरांचा त्रास सर्वच भागात आहे. सध्या स्वाईन फ्लूच्या भितीने सर्वांना ग्रासले आहे. त्यामुळे डुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शहरात मोकाट डुकरांपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी पंकज यादव किंवा मी (कल्लू) न.प.उपाध्यक्ष असताना पुढाकार घेतला होता. तेव्हापासून डुक्कर पालन करणाऱ्या समाजातील लोक आमचा राग करतात. मात्र आम्ही घाबरणार नाही. जनहितासाठी हा लढा सुरूच राहील, असेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
डुकरांच्या बंदोबस्ताचे निमित्त
स्वाईन फ्लूमुळे डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन दबाव आणण्यात आला होता. याशिवाय हल्ल्याच्या २-३ दिवस आधीच यासंदर्भात अध्यक्षांनी बैठकही बोलविली होती. त्यावरून डुक्कर पालन करणाऱ्यांमध्ये आणि न.प.च्या सफाई कामगारांच्या नेत्यांमध्ये आमच्याबद्दल रोष आहे. याचाच फायदा घेत मास्टरमाईंड असलेल्या नेत्याने हल्लेखोरांना भडकवून हा हल्ला करविला, असा आरोप यादव यांनी केला.
या प्रकरणातील हल्लेखोर युवक हे महाविद्यालयीन युवक आहेत. त्यापैकी एकाजवळ असलेली बाईक पोलिसांनी जप्त केली. त्या बाईकसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरायला त्याच्याकडे पैसे नाहीत. मग या प्रकरणात लढण्यासाठी नागपूरचा वकील आणण्यासाठी पैसे कुठून आले? असा सवाल करून या हल्ल्याची योजना आखणारा आणि त्यासाठी पैसे पुरविणारा दुसराच व्यक्ती असल्याचे यादव म्हणाले.
पंकज यादव काही वर्षांपासून गुंडागर्दीसारख्या प्रकारापासून दूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे न.प.मधील पक्षनेता, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अखिल भारतीय यादव महासभेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा दूध संघाचे संचालक, जिल्हा कुस्तिगीर संघाचे सचिव, दुर्गा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अशा विविध सामाजिक व राजकीय भूमिकेत आहे. त्यांचा संपूर्ण वेळ या कामात खर्च होत असताना त्यांचे अस्तित्व संपविण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.
आतातरी बंदोबस्त
करा- शर्मा
यादव बंधूंच्या आई-वडिलांपासून त्यांच्या घरात सामाजिक कार्याची परंपरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा यादव बंधूंनी डुकरांच्या बंदोबस्तासाठी घेतलेला पुढाकार हा कोणत्या समाजाविरूद्ध नसून नागरिकांच्या आरोग्यासाठीच आहे. त्यामुळे नगर परिषदेने आतातरी डुकरांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिव शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.