उमेदवारीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By Admin | Updated: June 11, 2014 00:06 IST2014-06-11T00:06:36+5:302014-06-11T00:06:36+5:30

केंद्रातील सत्ता परिवर्तनानंतर आमगाव विधानसभेत काय चित्र राहील याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. विद्यमान आमदार रामरतन राऊत हे काँग्रेसचे असले तरी त्यांच्या अगोदरच्या कालखंडात या क्षेत्रावर

Bashing of many knees for the candidature | उमेदवारीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

उमेदवारीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

ओ.बी.डोंगरवार - आमगाव
केंद्रातील सत्ता परिवर्तनानंतर आमगाव विधानसभेत काय चित्र राहील याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. विद्यमान आमदार रामरतन राऊत हे काँग्रेसचे असले तरी त्यांच्या अगोदरच्या कालखंडात या क्षेत्रावर भारतीय जनता पार्टीची पकड होती. त्यात माजी आ.महादेवराव शिवणकर यांची कारकिर्द बरीच मोठी होती. आमगाव विधानसभा क्षेत्र पूर्वी जुन्या भंडारा लोकसभा क्षेत्रात असल्याने लोकसभेत काँग्रेसला मताधिक्य जास्त असले तरी विधानसभेत मात्र एकगठ्ठा मते भाजपला जात होती. पण पाच वर्षापूर्वी आमगाव विधानसभा क्षेत्र गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात गेले आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यानंतर भाजपची परंपरा मोडीत काढत काँग्रेसने हा मतदार संघ काबीज केला.
आता हा मतदार संघ राखीव झाल्याने सर्वच पक्षामधील मुरब्बी लोकांची दुकानदारी बंद झाली. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रामरतन राऊत यांनी भारतीय जनता पार्टीचे रमेश ताराम यांचा पराभव केला. त्यावेळी ताराम यांचा पराभव हा मोठ्या फरकाने झाला नाही. त्यावेळी राष्ट्रवादीचे शंकर मडावी यांनी बंडखोरी केली होती. मात्र रामरतन राऊत यांच्याबद्दल असलेल्या आस्थेमुळे सर्वसामान्यांनी त्यांना साथ दिली. आताच्या परिस्थितीत मात्र बराच बदल दिसून येतो. सध्या काँग्रेस पक्षातील काही अनुभवी नेते मंडळीकडूनच त्यांना फटका बसल्याची शक्यता नाकारता येत नाही. यात आ.राऊत यांच्याभोवतीच्या चौकटीमुळे त्यांच्याबद्दलची नाराजी वाढत आहे. खरोखर ती काँग्रेसची चौकडी आहे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची कामे होत नाही असा ठपका सध्या विद्यमान आमदारावर त्याच्याच पक्षाकडून ठेवला जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदारासोबतच सध्या काँग्रेसकडून वसंत पुराम, नामदेवराव किरसान, मोतीलाल पिहीदे यांच्यात तिकीट मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला २५ हजारांची पिछाडी आहे. आमगाव तालुक्यात १३ हजार मते काँग्रेसला कमी आहेत. याचा अर्थ विद्यमान आमदाराला विधानसभा क्षेत्रात आपला गड कायम ठेवण्यात यश मिळणार किंवा नाही अशी कुजबूज सुरू आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीत ‘मोदी लाटे’नंतर फिल गुड आहे. त्यामुळे भाजपच्या तिकीटीसाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यात मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार शंकर मडावी, रमेश ताराम, सहसराम कोरोटे, संजय पुराम हे चार उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या चारपैकी दोन व्यक्तींमधील स्पर्धा अधिक तीव्र आहे. त्यात शंकर मडावी किंवा संजय पुराम यांच्यापैकी कुणालातरी लॉटरी लागण्याची शक्यता जास्त आहे.
बसपाचे उमेदवार अजूनपर्यंत निश्चित नसले तरी बसपा कॅडरचा प्रभाव या विधानसभा क्षेत्रात कमी झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत विविध पक्षांकडून आधी तिकीट मिळविण्यात कोण यशस्वी ठरतो त्यावरच पुढचा ‘सिकंदर’ ठरणार आहे.

Web Title: Bashing of many knees for the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.