बँकांमधील आर्थिक व्यवहार ठप्प
By Admin | Updated: October 24, 2015 01:46 IST2015-10-24T01:46:53+5:302015-10-24T01:46:53+5:30
गुरूवारच्या दसऱ्यानंतर शनिवार व रविवार असे तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत,...

बँकांमधील आर्थिक व्यवहार ठप्प
तीन दिवस सुट्या : एटीएम सुविधा ठरतेय महत्त्वाची
गोंदिया : गुरूवारच्या दसऱ्यानंतर शनिवार व रविवार असे तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व क्षेत्रीय बँकांच्या १२९ शाखांमधील आर्थिक व्यवहार ठप्प पडणार आहेत. या तीन दिवसात कोट्यवधींचे क्लिअरींग अडणार असले तरी सुट्यांचा आर्थिक व्यवहारांवर फारसा प्रभाव पडणार नसल्याचे अधिकृत सुत्रांचे म्हणणे आहे.
आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिना प्रामुख्याने सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात सुट्या येतात. कधी-कधी सलग सुट्या येत असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची लॉटरीच लागते. यंदाही तशाच सुट्या आल्या आहेत, मात्र गुरूवारच्या (दि.२२) सुटीनंतर शुक्रवारी (दि.२३) बँका सुरू असल्यामुळे गुरूवारी थांबलेले व्यवहार शुक्रवारी झाले. मात्र शनिवार (दि.२४) आणि रविवारची (दि.२५) शासकीय सुटी व्यापाऱ्यांसह अनेकांना त्रासदायक ठरणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व्यापारी व क्षेत्रीय बँकांच्या शहर व ग्रामीण भागात १२९ शाखा आहेत. सण-उत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. त्यात या सुट्यांचा नक्कीच अर्थचक्रावर परिणाम होणार आहे. मात्र हा परिणाम नगण्य राहणार असल्याचे अग्रणी जिल्हा प्रबंधकांनी सांगितले. विशेष म्हणजे बाजारातील ‘स्लॅक’ यापूर्वी कधीच दिसून आला नसल्याचे बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक रिंगणगावकर यांनी सांगितले. त्यामुळे या सुट्यांचा जास्त प्रमाणात परिणाम जाणवणार नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)