खाकीच्या करड्या नजरेमुळे गणेश विसर्जनातील नाचगाण्यावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST2021-09-22T04:32:41+5:302021-09-22T04:32:41+5:30
केशोरी : परिसरात २२ सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना बऱ्याच ...

खाकीच्या करड्या नजरेमुळे गणेश विसर्जनातील नाचगाण्यावर बंदी
केशोरी : परिसरात २२ सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना बऱ्याच गावांमधून राबविण्यात आल्याने गणेशोत्सवात पोलिसांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले नाही. तरी ही गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी खाकी वर्दीची कडक नजर असल्याने गणेश विसर्जनाच्या वेळी नाचगाण्यावर पूर्णपणे बंदी होती. त्या दृष्टीने ठाणेदार संदीप इंगळे स्वत: पोलीस कर्मचाऱ्यांसह येथील चौकाचौकांत तैनात असल्याचे दिसून आले.
कोरोना वैश्विक महामारीमुळे गेल्या वर्षापासून सार्वजनिक गणपती उत्सवावर निर्बंध लावण्यात आले आहेत. केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवीत ठाणेदार इंगळे यांनी या परिसरातील गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांचे पालन सार्वजनिक मंडळ योग्यरीतीने करतात किंवा नाही यावर नजर ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे अतिशय शिस्तबद्धरीत्या कसल्याही प्रकारचा गोंधळ न घालता गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यात आले.
कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी घालून दिलेले नियम सार्वजनिक मंडळांनी पाळण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी स्वत: आपल्या नियंत्रणात विसर्जनस्थळी मोक्याच्या ठिकाणावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पोलीस विभागाला चांगला प्रतिसाद दिला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांच्या नाचगाण्यावर निश्चितच बंदी आली होती.