बालाघाट डेमूने ट्रॅक्टरला उडविले
By Admin | Updated: April 2, 2016 02:16 IST2016-04-02T02:16:29+5:302016-04-02T02:16:29+5:30
बालाघाट मार्गावरील कटंगीवरून गोंदियाकडे येत असलेल्या डेमू गाडीने बिरसोला ते गोंदियादरम्यान असलेल्या मानवविरहित रेल्वे फाटकावरील

बालाघाट डेमूने ट्रॅक्टरला उडविले
मानवरहित : रेल्वेफटकावरील घटना
गोंदिया : बालाघाट मार्गावरील कटंगीवरून गोंदियाकडे येत असलेल्या डेमू गाडीने बिरसोला ते गोंदियादरम्यान असलेल्या मानवविरहित रेल्वे फाटकावरील रेल्वेरूळावर आलेल्या एका ट्रॅक्टरला धडक दिली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ट्रॅक्टरचे बरेच नुकसान झाले.
हा अपघात गुरूवारी सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास घडला. ही गाडी येण्याची वेळ झाली असताना छोटा ट्रॅक्टर (एमएच ३६, एल १४५४) मानवरहित रेल्वे फाटकावरून रेल्वेमार्ग ओलांडत होता. मात्र नेमका त्याच ठिकाणी तो ट्रॅक्टर बंद पडला. रेल्वे येत असल्याचे पाहून ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर तिथेच सोडून उडी मारून दूर पळाला. यामुळे डेमू गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली. यात ट्रॅक्टर गाडीच्या कॅटलगार्डमध्ये फसल्या गेला.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित गोंदिया स्थानकावरून अपघात मदत गाडी पाठवून फसलेल्या ट्रॅक्टरला रेल्वेमार्गावरून दूर करून मार्ग मोकळा केला. यासाठी रेल्वेचे नागपूर मंडळाचे व्यवस्थापक अशोक कंसल, अपर मंडळ व्यवस्थापक डी.सी. अहीरवार, वरिष्ठ मंडळ सुरक्षा अधिकारी ए.के. मसराम, अभियंता कांबळे यांनी सहकार्य केले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)