आवटीसाहेब, खावटींना आवरा !
By Admin | Updated: October 28, 2015 02:13 IST2015-10-28T02:13:31+5:302015-10-28T02:13:31+5:30
सध्या पोलिस स्टेशनमध्ये नवीन-नवीन पोलीस व सोबत अधिकारी रुजू झाले. जुने गेले नवीन आले, हिशेब बरोबर झाला.

आवटीसाहेब, खावटींना आवरा !
ओ.बी. डोंगरवार
सध्या पोलिस स्टेशनमध्ये नवीन-नवीन पोलीस व सोबत अधिकारी रुजू झाले. जुने गेले नवीन आले, हिशेब बरोबर झाला. मात्र जुने जातेवेळी नवीन आलेल्यांना काहीतरी ‘खावटी’चे बोधामृत देऊन जातात. सध्या पोलिस स्टेशनमध्ये काही अधिकाऱ्यांचे खावटीचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा आहे. काहीतरी चांगले करावे ही कल्पना मृतप्राय झाली. त्याजागी खावटीचे साम्राज्य आले. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षकांनी पोलिसांवर करडी नजर ठेवणे गरजेचे आहे.
नवीन आलेल्या पोलिस निरीक्षकांना तेवढा तालुक्याचा परिपूर्ण अभ्यास नाही. तो अभ्यास करण्याकरिता काही वेळ लागेल हे तेवढेच खरे आहे. त्याच अवधीत खावटींना आपला पराक्रम करण्याची नामी संधी मिळते तेव्हा संधीचे सोने करण्याकरिता कोणी वेळ वाया घालवणार नाही. ‘अभी नही तो कभी नही’ हे ब्रिदवाक्य समोर ठेऊन खावटी कर्मचारी आपली पदयात्रा सुरू करतात. तालुक्यात अवैध सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नगरात पट्टी घेतली जाते. मात्र हा व्यवसाय पड्यामागे सुरू आहे. गावागावात अवैध दारुची दुकाने मोठ्या थाटात सुरू आहेत. हे तेथील बिट जमादारांना माहिती आहे. मात्र कार्यरत पोलिस उपनिरीक्षकांना याची कल्पना असली तरी खावटीच्या नावावर फक्त कारवाई केली जाते.
पाठीमागे काय चालले, कोण किती घेतो हे सर्व पड्यामागे असल्याने कुणालाच याची कल्पना नाही. मात्र जे सुरू आहे ते योग्य नाही. अगोदरच्या अधिकाऱ्यांनी खावटी केली नाही तो मुद्दा नाही. मात्र त्यांनी ‘आदमी देख के’ हा मुळमंत्र जोपासला होता. सध्या ‘कोई भी चलेगा’ पिचकून दाबून खावटी वसूली केली जाते. काही अधिकारी दुय्यम दर्जाचे आहेत ते स्वत:ला सर्वात मोठा अधिकारी समजून खावटीला उत्तेजना देतात. रात्री चालणाऱ्या चारचाकी वाहनांकडून किंमत ठरली आहे. अवैध दारु, अवैध सट्टा यांची किंमत ठरली आहे. तसेच ट्राफिकमध्ये सुद्धा व्यापक बोलबाला आहे. काही अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच्या नावावर जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे. जमीन खरेदी करण्यापर्यंत बाहेरुन आलेल्या काही दादांची हिंमत वाढली कशी हा मोठा संशोधनाचा विषय आहे. अशा खावटी अधिकाऱ्यांना काही दिवसांकरिता अतिसंवेदनशील भागात तैनाती केली तर खावटी बहादुरांना आळा बसू शकेल.
मात्र प्रशासन तशी दखल घेत नाही. खाकी वर्दीचा धाक दाखवून खावटीचा कार्यक्रम चालवितात हे तेवढेच सत्य आहे. खाकीवर्दी अंगावर चढली म्हणजे मी मोठा शहाणा असे कोणी समजू नये, मात्र आमगाव पोलिस स्टेशन मध्ये ते चित्र दिसत नाही. आमचे कोणी काही वाकडे करु शकत नाही, हा विचार बाळगून काही लोक वागतात. हे तेवढेच सत्य आहे. मात्र ज्या घटना तालुक्यात घडल्या त्याचा शोध घेण्याचा किंवा छडा लागल्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला असला तरी हाताला यश मिळाले नाही. विर्शी येथील व्यापाऱ्याचा खून, शिवनी येथील शाळेतील मुलीचा रेल्वेने कटून मृत्यू खरोखर ही आत्महत्या आहे का? हे दोन्ही प्रकरण गुलदस्त्यात बंद आहे. अजुनपर्यंत दोन्ही प्रकरणांत आरोपी मोकाट आहेत. हेच प्रकरण घेऊन जनता रस्त्यावर उतरली असती तर तिगाव कांडाची पुनरावृत्ती होण्यास विलंब लागला नसता.
आता जुने जाँबाज गेले तरी त्यांनी जातेवेळी तालुक्याची ओळखपरेड करुन दिली असेल हे तेवढेच खरे आहे. मात्र सध्या जे अधिकारी आहेत ते खावटी पलीकडे कोणताच विचार करताना दिसत नाही. त्यामुळे साहेब थोडे सावध व्हा व सर्वांची ओळख परेड करुन खावटींना आवरा, हीच आपणाकडून अपेक्षा आहे.