प्लाझ्मा डोनरसाठी जनजागृती, गोंदिया विधानसभा ग्रुपचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:21 IST2021-04-29T04:21:46+5:302021-04-29T04:21:46+5:30
गोंदिया : मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाने उद्रेक माजविला आहे. अशातच रुग्णांना प्राणवायूसह अनेक औषधींची आवश्यकता निर्माण झाली असताना ...

प्लाझ्मा डोनरसाठी जनजागृती, गोंदिया विधानसभा ग्रुपचा उपक्रम
गोंदिया : मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाने उद्रेक माजविला आहे. अशातच रुग्णांना प्राणवायूसह अनेक औषधींची आवश्यकता निर्माण झाली असताना अनेक रुग्णांना प्लाझ्मा देण्याची गरज आहे. सध्या गोंदियात प्लाझ्माची सोय उपलब्ध नसल्याने नागपूरवरूनच रुग्णांना प्लाझ्मा घेवून यावे लागते. अशा स्थितीत गोंदियात प्लाझ्मासाठी जनजागृती करुन ज्या रुग्णानी संसर्गावर मात केली आहे. त्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा,यासाठी गोंदिया विधानसभा व्हाॅटसॲप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून रक्त तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संसर्ग बाधित रुग्णांसाठी सेवेचे हात पुढे सरसावले आहेत. अशातच गोंदिया येथे सोशल मीडियावर गठीत गोंदिया विधानसभा समूहाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने शहरात प्लाझ्माची कमतरता भासू नये व रुग्णांना वेळेवर प्लाझ्मा मिळावे, या उदात्त हेतूने विधानसभा समूहाच्या माध्यमातून ज्या रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. अशा रुग्णांनी पुढे येवून प्लाझ्मादान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी जनजागृतीही सुरू आहे. मागील २ दिवसांपासून हा उपक्रम सुरू केला असून अनेक कोरोनावीर प्लाझ्मा देण्यासाठी आपल्या रक्ताचे नमुने देत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांतच शहरात प्लाझ्मा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एकंदरीत ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यांना एक महिन्याचा कालावधी झाला आहे. अशा कोरोनावीरांनी सेवाभावनेतून प्लाझ्मा दान करावे व संसर्गबाधित रुग्णांचे प्राण वाचवावे, असे गोंदिया विधानसभा ग्रुपने कळविले आहे.