नियंत्रणासाठी जागृतीची गरज

By Admin | Updated: July 13, 2015 01:29 IST2015-07-13T01:29:28+5:302015-07-13T01:29:28+5:30

जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला भविष्यात चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे.

Awareness need to control | नियंत्रणासाठी जागृतीची गरज

नियंत्रणासाठी जागृतीची गरज

गोपालदास अग्रवाल यांचे मत : जागतिक लोकसंख्या दिवस उत्साहात साजरा
गोंदिया : जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला भविष्यात चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. वर्तमान लोकसंख्या लक्षात घेऊन शासन सर्व नियोजन करीत असते. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे नियोजन अयशस्वी ठरते. वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम लक्षात घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यास लोकसंख्या नियंत्रिण करणे शक्य आहे, असे मत आ. गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
शनिवारी ११ जुलै रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सभागृहात जिल्हा आरोग्य प्रशासन, आयएमए अधिकारी महासंघ, अधिकारी-कर्मचारी समन्वय समिती, लायन्स क्लब व आकृती थिंक टुडे बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. संजय जायस्वाल होते. प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, परिमंडळाचे सहायक संचालक डॉ. पुरूषोत्तम मडावी उपस्थित होते.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, मुलगाच झाला पाहिजे ही मानसिकता आता पालकांनी बदलविणे गरजेचे आहे. मुलांच्या अपेक्षेने लोकसंख्या वाढत आहे. मुलगी दोन्ही कुटुंबांचा उध्दार करते, याकडे लक्ष दिले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येमुळे व रोजगाराच्या शोधामुळे झपाट्याने शहरीकरण होत आहे.
शहरी भागात शिक्षित वर्ग असल्यामुळे मर्यादित कुटुंबाला महत्त्व असताना ग्रामीण भागात कुटुंबाची सदस्य संख्या वाढत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोंदिया पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. लिटल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थिनींनी लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम यावर आधारित नाटिका सादर केली. संचालन पवन वासनिक यांनी तर आभार डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी मानले.
कार्यक्रमाला अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दुधे, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राज वाघमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वाघमारे, रेडीआॅलॉजिस्ट डॉ. चहांदे, बाल रोग तज्ज्ञ डॉ. लाटणे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. जायस्वाल, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, शासकीय नर्सिंग विद्यालयाचे प्राचार्य रामटेके, आकृती थिंक टुडे संस्थेचे प्रमोद गुडधे, दिव्या भगत, शर्मिष्ठा सेंगर यांच्यासह शासकीय नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी, गोंदिया पब्लिक स्कूल, लिटल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थिनी तसेच केटीएस व बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लोकसंख्या वाढीबाबत मान्यवरांची मते
प्रास्ताविकातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. तसेच केटीएसमधून रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची माहिती दिली.
डॉ. हरीश कळमकर म्हणाले, वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम लक्षात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. आरोग्याच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे मृत्यूदर कमी झाले व आयुष्यमान वाढले आहे. प्रत्येकाने आता मर्यादित कुटुंबाचा विचार करून ‘हम दो हमारे दो’ याचे पालन करावे. वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून डॉ. जयस्वाल म्हणाले, माता मृत्यूदर कमी होणे गरजेचे आहे. मुलामुलीमध्ये भेद करणे थांबले पाहिजे. मुलगा जन्माला आला पाहिजे, या अपेक्षेने लोकसंख्या वाढत आहे. मुलापेक्षा मुली जबाबदारीने वागत असून चांगल्या गुणाने उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलीचे प्रमाण मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम कसे राहील याकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.

Web Title: Awareness need to control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.