पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर अवतरले भारतरत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:15 IST2018-12-31T22:14:24+5:302018-12-31T22:15:19+5:30
सुरक्षा भिंतीवर निसर्गाचा देखावा काढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सुरक्षाभिंत प्रेरणादायी ठरावी असा अनेकांचा मानस असतो. परंतु गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांनी भारतात आजपर्यंत किती भारतरत्न झालेत हे सहजरित्या लोकांच्या ध्यानीमनी राहावे. यासाठी आपल्या शासकीय निवासस्थानाच्या सुरक्षा भिंतीवर देशातील सर्वच ४५ भारतरत्नांचे चित्र काढून लोकांना प्रेरणा मिळवून देण्याचे काम केले आहे.

पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर अवतरले भारतरत्न
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुरक्षा भिंतीवर निसर्गाचा देखावा काढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सुरक्षाभिंत प्रेरणादायी ठरावी असा अनेकांचा मानस असतो. परंतु गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांनी भारतात आजपर्यंत किती भारतरत्न झालेत हे सहजरित्या लोकांच्या ध्यानीमनी राहावे. यासाठी आपल्या शासकीय निवासस्थानाच्या सुरक्षा भिंतीवर देशातील सर्वच ४५ भारतरत्नांचे चित्र काढून लोकांना प्रेरणा मिळवून देण्याचे काम केले आहे.
पावसामुळे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातील भिंत खाली कोसळली होती. त्यानंतर सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात आले. त्या ७० फूट लांब व ६ फूट उंच सुरक्षा भिंतीचा वापर समाजात जनजागृती करण्यासाठी केला. गोंदिया जिल्ह्यात सारस वैभवही त्या भिंतीवर यायला हवे ही मनोमन इच्छा असतांना त्यांनी देशातील सर्व ४५ भारतरत्नांचे चित्र त्या ७० फूट लांब असलेल्या सुरक्षाभिंतीवर काढून लोकांना एक प्रेरणा देणारी भिंत तयार केली. गोंदियातील दोन आर्टिस्टच्या माध्यमातून या सुरक्षा भिंतीवर भारतरत्नांचे चित्र काढण्यात आले. गोंदियाच्या पतंगा मैदानावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील भागात जिल्हाधिकारी,मुख्य कार्यपालन अधिकारी, मुख्य न्यायाधीश, पोलीस अधीक्षक व जि.प.अध्यक्ष यांचे शासकीय निवासस्थान याच रस्त्यावर आहेत. त्या बंगल्यांच्यासमोर कर्मचाºयांची वसाहत आहे. त्या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या मुलांची याच रस्त्यावरून ये-जा असते. त्या मुलांना, कर्मचाऱ्यांना या भारतरत्नांची सहज माहिती व्हावी, यासाठी ही सुरक्षाभिंत त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. सहजरित्या कुणालाही प्रश्न विचारला की देशात आतापर्यंत किती भारतरत्न झालेत तर पदावर असलेल्या मोठ्या-मोठ्या अधिकाऱ्यांनाही या प्रश्नाचे उत्तर सहज आठवत नाहीत. परंतु या निमित्ताने गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांनी या सुरक्षाभिंतीवर तयार केलेल्या चित्रांमुळे आता गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना ती भिंत पाहिल्यावर सहजरित्या भारतरत्न कोण-कोण झाले याचे स्मरण होणार आहे. या सुरक्षाभिंतीतून जनजागृतीपर व सामान्य ज्ञान वाढविणारी ही भिंत आजघडीला जिल्ह्यात कुतूहलाचा विषय ठरत आहे.
‘त्या’ भिंतीवर हे भारतरत्न
पोलीस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्यद्वाराजवळ असलेल्या सुरक्षा भिंतीवर भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी.व्ही.रमण, भगवान दास, एम. विश्वसर्या, पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभपंत, धोंडो केशव कर्वे, बिधानचंद्र रॉय, पुरूषोत्तम दास टंडन, राजेंद्र प्रसाद, डॉ. जाकीर हुसेन, पांडुरंग वामन काने, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, वराहगीरी व्यंकटगिरी, के. कमराज, मदर टेरेसा, विनोबा भावे, खान अब्दुल गफ्फार खान, एम.जी. रामचंद्रन, डॉ. बी.आर. आंबेडकर, नेल्सन मंडेला, वल्लभभाई पटेल, राजीव गांधी, मोरारजी देसाई, अब्दुल कलाम आझाद, जे.आर.डी.टाटा, सत्यजीत रे, ए.पी.जे.अब्दुल कलाम, गुलजारीलाल नंदा, अरूणा असफ अली, एम.एस.शुब्बलक्ष्मी,चिदंबरम सुब्रमण्यम, जयप्रकाश नारायण, रवी शंकर, अमर्त्य सेन, गोपीनाथ बरडोई, बिस्मील्ला खान, भीमसेन जोशी, सी.एन.आर.राव, सचिन तेंडुलकर, अटल बिहारी वाजपेयी, मदन मोहन मालविय यांचे चित्र काढण्यात आले. ती भिंत आकर्षक दिसावी यासाठी गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेला सारस त्या भिंतीवर वावरतांना ठिकठिकाणी दाखविले आहे.
सातवर्षे पुरस्कार घेणाऱ्यांची केली निवड
पोलीस अधिक्षकांच्या बंगल्यावरील सुरक्षा भिंतीवर ४५ भारतरत्न चित्रातून हुबेहुब उतरविण्याचे काम गोंदियातील आर्टीस्ट इरफान कुरेशी यांनी केले आहे. ते पेशाने शिक्षक आहेत. गोंदियातील एका खासगी शाळेत ते चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वनविभागामार्फत दरवर्षी होणाºया विदर्भ चित्रकला स्पर्धेत मागील सात वर्षापासून ते पारीतोषिक पटकावित असल्यामुळे पोलीस अधिक्षकांनी त्यांची निवड करून ते चित्र काढण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते.
नवीन तयार करण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचा वापर एक चांगला संदेश समाजाला देण्यासाठी देशातील संपूर्ण भारतरत्नांची माहिती व चित्र त्या सुरक्षा भिंतीवर तयार करण्यात आली. देशातील रत्नांची सहज माहिती या माध्यमातून लोकांना होऊ शकेल.
- हरिष बैजल
पोलीस अधीक्षक गोंदिया.