नवीन विद्युत मीटरसाठी महावितरणची टाळाटाळ
By Admin | Updated: November 13, 2014 23:05 IST2014-11-13T23:05:14+5:302014-11-13T23:05:14+5:30
विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरीचे शाखा अभियंता यांचे साटेलोटे

नवीन विद्युत मीटरसाठी महावितरणची टाळाटाळ
काचेवानी : विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरीचे शाखा अभियंता यांचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बरबरपुरा येथील मनोहर कनोजे यांचा मुलगा मनोज याला दुसऱ्या गावात वीज मीटर देण्यास विद्युत विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुकेश कनोजे याने काचेवानी ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन घर तयार केले. हे घर त्यांच्या आईच्या नावे असून तेथे नवीन मीटर लावून वीज पुरवठा सुरू करण्यासंबंधीचे प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र तिरोडा विद्युत वितरणचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी अनावश्यक कारणे समोर करून मीटर देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
बरबसपुरा ग्रामपंचायत अंतर्गत जि.प. शाळेजवळ मुकेशचे वडील मनोहर कनोजे यांच्या नावे पक्के घर आहे. तेथे वडिलांच्या नावेच वीज मीटर होता. मात्र तत्कालिन उपकार्यकारी अधिकारी ए.व्ही. तुरकर यांनी तपासणी करून अनावश्यक ८२ हजार रूपये व कंपाऊंड चार्ज ३० हजार रूपये आकारले. हे प्रकरण गोंदियाच्या ग्राहक न्यायालयात सुरू आहे. मात्र सदर दोन्ही अधिकारी वडिलांच्या नावे असलेला अनावश्यक वीज आकार भरा, तेव्हाच नवीन घराला मीटर मिळेल, असे सांगत असल्याचा आरोप मुकेशने केला आहे.
मुकेशने सांगितल्यानुसार, बरबसपुरा येथे वडिलांच्या नावे असलेला वीज आकार न्यायालयाच्या निर्णयानंतर ते भरतील. ती त्यांची जबाबदारी आहे. किंवा तो भुर्दंड त्यांच्या संपत्तीतून वसूल करावा. त्याला आपला विरोध नाही. मात्र काचेवानीच्या ग्रामपंचायत हद्दीतील नवीन घराचा संबंध त्यांच्याशी येत नाही. तरीसुद्धा सदर दोन्ही अधिकारी हेतूपुरस्पर नाकह त्रास देवून मीटर देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मुकेशने केला आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी मीटर डिमांड दिले नाही आणि वीज पुरवठा सुरू केले नाही, तर आंदोलन सुरू करण्याचा इशारा कनोजे यांनी दिला आहे. (वार्ताहर)