आदिवासी महामंडळाकडून बारदान्याची रक्कम देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:02+5:302021-02-09T04:32:02+5:30
केशोरी : गेल्या वर्षीच्या खरीप व रब्बी धान हंगामातील धान शेतकऱ्यांनी स्वत:कडील बारदाना उपयोगात आणून आदिवासी महामंडळाला धानाची विक्री ...

आदिवासी महामंडळाकडून बारदान्याची रक्कम देण्यास टाळाटाळ
केशोरी : गेल्या वर्षीच्या खरीप व रब्बी धान हंगामातील धान शेतकऱ्यांनी स्वत:कडील बारदाना उपयोगात आणून आदिवासी महामंडळाला धानाची विक्री केली होती. धानाच्या चुकाऱ्याबरोबर बारदान्याची रक्कम देण्यात येईल, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु तब्बल एक वर्षाचा काळ लोटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बारदान्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, इळदा या तीन आधारभूत धान खरेदी केंद्रांमधून आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत या परिसरातील शेतकऱ्यांची सन २०१९-२० या वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील धान खरेदी केली. धान खरेदीसाठी महामंडळाकडे बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या स्वत:जवळील बारदाना उपयोगात आणून धानाची विक्री केली. एक वर्षाचा कालावधी लोटूनही महामंडळाने शेतकऱ्यांना बारदान्याची रक्कम किंवा बारदाना परत दिली नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी विचारणा केली असता महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचे सांगितले. आदिवासी महामंडळाजवळ बारदान्याची तरतूद नसेल तर किमान बारदाना शेतकऱ्यांना परत द्यावा. ज्या वेळेस शेतकऱ्यांचा बारदाना उपयोगात आणला गेला तेव्हा धानाच्या चुकाऱ्याबरोबर बारदान्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, असे सांगून शेतकऱ्यांनी आदिवासी महामंडळाने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बारदान्याची रक्कम त्वरित बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.