धान खरेदीत गैरसोय टाळा
By Admin | Updated: June 5, 2015 01:55 IST2015-06-05T01:55:37+5:302015-06-05T01:55:37+5:30
जिल्ह्यातील शेतकरी खरीप आणि रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतो.

धान खरेदीत गैरसोय टाळा
पालकमंत्र्यांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी खरीप आणि रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतो. धान उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धानाची खरेदी करताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन आवश्यक त्या ठिकाणी धान खरेदी केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राबाबतचा आढावा १ जून रोजी पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, आ. विजय रहांगडाले, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती प्रकाश गहाणे, महिला व बाल कल्याण समितीचे सभापती सविता पुराम, कृषी समिती सभापती मोरेश्वर कटरे, जि.प. सदस्य कल्याणी कटरे, राजेश चतूर, उमाकांत ढेंगे, दीपक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होणार नाही, तसेच त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे. ज्या संस्था केंद्र सुरू करण्यास इच्छुक नसतील तेथे शेजारच्या तालुक्यातील संस्थांकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे. धान भरडाई केंद्राच्या तक्रारी येणार नाही याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष द्यावे, असे पालकमंत्री बडोले म्हणाले.
आढावा सभेला जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी गणेश खर्चे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)