कटंगी प्रकल्पग्रस्तांचे आत्मदहन तात्पुरते मागे
By Admin | Updated: May 1, 2016 01:39 IST2016-05-01T01:39:49+5:302016-05-01T01:39:49+5:30
मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांनी २८ शेतकऱ्यांसह १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

कटंगी प्रकल्पग्रस्तांचे आत्मदहन तात्पुरते मागे
आमदारांनी केली मध्यस्ती : अधिकाऱ्यांची घेतली बैठक
गोरेगाव : मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांनी २८ शेतकऱ्यांसह १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावरमात्र क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी मध्यस्ती करून अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावर कटंगी मध्यम प्रकल्पग्रस्तांनी तात्पुरते आत्मदहन मागे घेतले.
तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून शासनाद्वारे भुलथापा देऊन त्यांच्या मागण्यांबाबत टाळाटाळ केली जात आहे. सततच्या या टोलवाटोलवीला कंटाळून मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांनी १ मे रोजी २८ प्रकल्पग्रस्तांनी घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावर आमदार रहांगडाले यांनी शनिवारी (दि.३०) तहसील कार्यालयात बैठक घेतली.
तहसीलदार कल्याण डहाट, पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, कटंगी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांच्यासह शेतकरी व पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, जिल्हा महासचिव नितीन कटरे, जिल्हा परिषद सदस्य रोहीणी वरखडे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनंता ठाकरे, दिलीप येडे प्रामुख्याने बैठकीला उपस्थित होते.
यावेळी आमदार रहांगडाले यांनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून शासकीय, प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरून ना न्याय मिळवून देणार असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले. आमदार रहांगडाले यांच्या मध्यस्ती व सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलेले आश्वासन बघता प्रकल्पग्रस्तांनी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आत्मदहन करण्याचा पवित्रा मागे घेतला. तसेच आत्मदहन मागे घेण्याचे लिहून दिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे आत्मदहन सध्यातरी टळÞले आहे. (तालुका प्रतिनिधी)