आॅटो उलटून दोघे ठार
By Admin | Updated: May 14, 2015 00:48 IST2015-05-14T00:48:05+5:302015-05-14T00:48:05+5:30
कोहमारा-वडसा मार्गावरील कोरंभीटोला-आसोली नजीक बुधवारी सकाळी ११ वाजता दरम्यान आॅटो उलटून ...

आॅटो उलटून दोघे ठार
कोरंभीटोलाजवळील घटना : आठ प्रवासी जखमी
ंअर्जुनी-मोरगाव : कोहमारा-वडसा मार्गावरील कोरंभीटोला-आसोली नजीक बुधवारी सकाळी ११ वाजता दरम्यान आॅटो उलटून घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आॅटोत बसलेले आठ इसम जखमी झाले. रंजूबाई खेमराज रामटेके (३६, रा. महागाव) व आॅटो चालक जागेश्वर नामदेव लांजेवार (३५, रा.ईटखेडा) अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी (दि.१३) सकाळी महागाव येथून तीन चाकी आॅटो एमएच ३५-२८५५ हा प्रवासी घेऊन वडसा-देसाईगंज येथे जाण्यासाठी निघाला. बोरी येथून या आॅटोत पिल्लारे कुटुंबीय एका विवाह सोहळ्यात जाण्यासाठी बसले. कोरंभी ते आसोली दरम्यान चालकाचे आॅटोवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेला फलकाला धडक देऊन हा आटो शेतात उलटला. या अपघातात रंजूबाई रामटेके तसेच आॅटो चालक जागेश्वर नामदेव लांजेवार हे घटनास्थळीच ठार झाले.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवीण साधू नेवारे (६), सुंदरबाई साधू नेवारे (२५, रा. मांडोखाल) व देवीदास महादेव पिल्लारे (३०, रा.बोरी) यांना गोंदियाला उपचारासाठी पाठविण्यात आले. तर शांता विनायक फुले (६०, रा. कोरंभीटोला) या महिलेला घटनास्थळावरुनच ब्रह्मपुरी येथे हलविले.
सुमित देवरास पिल्लारे (५) व सरिता देवरास पिल्लारे (२५, रा.बोरी) हे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर मृतक रंजूबाईची मुले प्रतीक रामटेके (१३) व मयूर रामटेके (७,रा. महागाव) यांना कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार देऊन घरी पाठविण्यात आले.
मृतकांची ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. हा आॅटो अरुणनगर येथील विमल कीर्तनीया यांच्या मालकीचा आहे. याप्रकरणी अर्जुनी मोरगावचे ठाणेदार अभिषेक पाटील, सहा पोलीस निरीक्षक राजेश गज्जल व हवालदार विजय तिरपुडे तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)