पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न
By Admin | Updated: August 26, 2015 01:39 IST2015-08-26T01:39:35+5:302015-08-26T01:39:35+5:30
मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या एका तरुणीला दोन तरुणांनी दुचाकीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणीने समयसूचकतेने दुचाकीवरून उडी घेतली.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न
सिनेस्टाईल प्रकार : मोहाडी पोलिसांनी दोन तरुणांना पकडले, तरुणीने दाखविली समयसूचकता, दुचाकी जप्त
तुमसर : मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या एका तरुणीला दोन तरुणांनी दुचाकीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणीने समयसूचकतेने दुचाकीवरून उडी घेतली. त्यानंतर आश्रयासाठी लपण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणांनी तिला शोधून दुचाकीने घेऊन जात होते. दरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या मोहाडी पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर तरुणीच्या अपहरणाचा डाव फसला.
तुमसर येथील इंदिरानगरात १९ वर्षीय तरुणी आईसोबत राहते. पितृछत्र नसलेल्या ही मुलगी व तिची आई मोलमजुरीची कामे करतात. रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास रोशन चामट रा.जवाहरनगर (गोवरी) व त्याचा मित्र हे दोघे त्या तरुणीच्या घरी आले. त्यावेळी ती झोपलेली होती. झोपेतच रोशनने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून भांगात कुंकू भरले.
त्यानंतर दुचाकीने तिला घेऊन गोवरी (जवाहरनगर) कडे निघाले. त्यावेळी प्रसंगावधानता राखून तिने दुचाकीवरून उडी मारली. त्यानंतर लगतच्या एका घरात आश्रयाकरिता हाक मारली. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. आवाजामुळे ती त्या तरुणांना दिसली. त्यानंतर या दोन युवकांनी दुचाकीवर बसवून तिला जवाहरनगरकडे घेऊन निघाले.
दरम्यान, मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिराजवळील मार्गावर गस्तीवर असलेल्या मोहाडी पोलिसांना ते दिसले. पोलिसांनी त्या तरुणांची दुचाकी अडवली. चौकशीदरम्यान या तरुणीने पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानंतर मोहाडी पोलिसांनी तुमसर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना बोलाविले. तुमसर पोलिसांनी दोन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ती मुलगी व तिच्या आईचे बयाण नोंदविण्यात आले आहे. आता ही तरुणी तुमसरातील आपल्या आत्याकडे राहत आहे.
रोशन चामट हा त्या तरुणीचा दूरचा नातेवाईक आहे. सन २०१४ मध्ये रोशनचा अपघात झाला होता त्यावेळी ही तरुणी आईबरोबर गोवरी येथे रोशनच्या घरी गेली होती.
या दोघांचे लग्न होणार होते, परंतु या तरुणीचा लग्नाला विरोध होता, अशी माहिती तिने बयानात दिली आहे. यासंदर्भात तुमसर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता बयान घेणे सुरू असून अद्याप गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
रविवारच्या मध्यरात्री दोन तरुण एका तरुणीला दुचाकीवर बसवून जात होते. त्यांना चौंडेश्वरी मंदिराजवळ रोखण्यात आले तेव्हा मुलीने सांगितलेल्या आपबितीवरुन तुमसर पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यांची चौकशी तुमसर ठाण्यात सुरू आहे.
- सुभाष चौधरी,
सहायक उपनिरीक्षक, मोहाडी.