उपविभागीय कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:28+5:302021-02-06T04:54:28+5:30
तिरोडा : येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाला सुरुवातीपासूनच रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मंजूर पदसंख्येपैकी रिक्त पदेच ...

उपविभागीय कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
तिरोडा : येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाला सुरुवातीपासूनच रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मंजूर पदसंख्येपैकी रिक्त पदेच अधिक असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे, तसेच ऑगस्ट २०२० पासून नियमित उपविभागीय अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. या प्रकाराकडे लक्ष घालून शासन-प्रशासनाने येथील रिक्त पदे भरणे अत्यावश्यक झाले आहे.
काही वर्षांपूर्वी तिरोडा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय मंजूर होऊन सुरूही झाले. त्यासाठी एकूण १० पदे मंजूर करण्यात आली. यात उपविभागीय अधिकारी मंजूर पद १ असून, सध्या हे पद रिक्त आहे. अव्वल कारकुनाची २ पदे मंजूर असून, १ पद भरण्यात आले आहे, तर १ पद रिक्त आहे. महसूल सहायकाची २ पदे मंजूर असून, १ पद भरण्यात आले, तर १ पद रिक्त आहे. वाहन चालकाचे १ पद मंजूर असून, ते आताही भरण्यात आले नाही. स्टेनोचे १ पद मंजूर असून, ते रिक्तच आहे. शिपायाची २ पदे मंजूर असून, १ भरण्यात आले, तर १ पद रिक्त आहे, तसेच नायब तहसीलदारांचे १ पद मंजूर असून, ते भरण्यात आले आहे. अशा प्रकारे मंजूर १० पदांपैकी ६ पदे रिक्त असून, केवळ ४ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हे उपविभागाचे कार्यालय सुरू आहे.
अनेक कामे रखडलेली
येथे १२ ऑगस्ट २०२० पासून नियमित उपविभागीय अधिकारी नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून मंजूर होण्यासाठी आलेल्या मर्ग समरी, नागरिकांच्या झुडपी जंगलाच्या जमिनीची समस्या व इतर अनेक कामे रखडलेली आहेत. नागरिकांना एकाच कामासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात; पण कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण व प्रभारी अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते.
५ प्रभारी अधिकारी बदलले
तिरोड्यात १२ ऑगस्ट २०२० पर्यंत गंगाधर तळपाडे हे उपविभागीय अधिकारी होते. त्यानंतर येथे नियमित अधिकारी मिळू शकले नाहीत. तेव्हापासून आतापर्यंत पाच ते सहा महिन्यांचा काळ लोटला असून, या काळात तब्बल ५ प्रभारी अधिकारी बदलले आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे यांच्यानंतर १२ ऑगस्ट २०२० पासून गोंदियाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राहुल खांदेभराड यांना तिरोड्याच्या उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला. त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर १ सप्टेंबरपासून तिरोड्याचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना प्रभारी पदभार देण्यात आला. यानंतर १४ डिसेंबरपासून गोंदियाचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजय राऊत यांना पदभार सोपविण्यात आला, तर ५ जानेवारी २०२१ पासून गोरेगावचे तहसीलदार सचिन गोसावी यांना पदभार देण्यात आला, तसेच १ फेब्रुवारीपासून पुन्हा उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजय राऊत यांना पदभार देण्यात आला आहे.