अद्याप सापडले नाही मारेकरी
By Admin | Updated: July 16, 2015 01:38 IST2015-07-16T01:38:44+5:302015-07-16T01:38:44+5:30
येथील एका व्यापाऱ्याच्या पत्नीची हत्या होऊन सहा दिवस उलटले. मात्र अद्यापही मारेकऱ्यांचा शोध लागला नाही.

अद्याप सापडले नाही मारेकरी
दरोडा व हत्या : महिला वर्गात दहशतीचे वातावरण
अर्जुनी मोरगाव : येथील एका व्यापाऱ्याच्या पत्नीची हत्या होऊन सहा दिवस उलटले. मात्र अद्यापही मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. पोलीस यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. मारेकऱ्यांचा शोध न लागल्यामुळे महिला वर्गात दहशत कायम आहे.
येथील इलेक्टॉनिक्स वस्तुंचे व्यापारी सुरेश पशिने यांच्या पत्नी नितू यांची अज्ञात मारेकऱ्यांनी ९ जुलै रोजी त्यांच्या घरी भरदिवसा हत्या केली. या हत्येचा उलगडा करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. हत्या उघडकीस आल्याक्षणीपासूनच पोलीस यंत्रणा कामाला लागली. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, ठाणेदार अभिषेक पाटील, सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप साळुंखे तसेच स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया व बाहेरुन आलेल्या पोलीसांच्या चमू येथे तपासकामात व्यस्त आहेत. तपासाच्या विविध पैलूंचा वापर करीत मारेकऱ्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्यापही मारेकरी गवसले नाहीत.
अर्जुनीत अशा घटना घडू नये तसेच मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी व्यापारी संघटनेतर्फे १० जुलै रोजी तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मृतक नितूची हत्या नेमकी कशासाठी झाली हे गुढ अद्यापही कायम आहे. या हत्येचा सुगावा लागावा यासाठी गोंदिया येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने सानगडी व लाखांदूरकडे जाणाऱ्या टी प्वार्इंटपर्यंतचा मार्ग दर्शविला.श्वान त्यापुढे गेला नाही.
रविवारी (दि.१२) खा. नाना पटोले यांनी मृतकाचे कुटुंबियांचे सांत्वन केले. तपासासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांश्ी चर्चा केीली व मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. २-३ दिवसात शोध लागण्याची शक्यता असल्याचे खा. पटोले यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. या मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मात्र अद्याप भेट दिली नाही. रविवारी ते सडक अर्जुनी येथे पंचायत समिती सभापती- उपसभापती निवडणुकीदरम्यान उपस्थित असल्याचे समजते. (तालुका प्रतिनिधी)