तहसीलदाराची बोगस स्वाक्षरी करणाऱ्या एकास अटक
By Admin | Updated: November 9, 2014 22:32 IST2014-11-09T22:32:32+5:302014-11-09T22:32:32+5:30
जातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी तहसीलदाराची बोगस स्वाक्षरी करुन प्रकरण देवरीच्या उपविभागीय कार्यालयात पाठविणाऱ्या एकाला आमगाव पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८.२५ वाजता अटक केली आहे.

तहसीलदाराची बोगस स्वाक्षरी करणाऱ्या एकास अटक
गोंदिया : जातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी तहसीलदाराची बोगस स्वाक्षरी करुन प्रकरण देवरीच्या उपविभागीय कार्यालयात पाठविणाऱ्या एकाला आमगाव पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८.२५ वाजता अटक केली आहे. नरेंद्र आत्माराम डोंगरे (३१) रा. तिगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आमगाव तहसील कार्यालय अंतर्गत छोट्या सेतू केंद्राचे काम तिगाव येथील नरेंद्र आत्माराम डोंगरे (३१) याच्याकडे देण्यात आले होते. त्याने तिगाव परिसरातील १३ लोकांचे प्रकरणे जातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी देवरीच्या उपविभागीय कार्यालयात पाठविले. त्या प्रकरणांवर आमगाव येथील तहसीलदार राजीव शक्करवार यांची बोगस स्वाक्षरी करण्यात आली होती. हे प्रकरण तहसीलदार राजीव शक्करवार यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून डोंगरे विरोधात विधानसभा निवडणुकीपूर्वी आमगाव पोलिसात तक्रार केली आहे. आरोपी नरेंद्र डोंगरे ने आॅगस्ट महिन्यात हे प्रकरण पाठविले होते. या संदर्भात आमगाव पोलिसांनी नरेंद्र डोंगरेविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने नरेंद्रला ११ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात तपास करताना सहायक पोलिस निरीक्षक शेळके यांनी पाठविलेल्या प्रकरणांची कागदपत्रे तपासली असता डोंगरे यांच्या रजिस्टरमध्ये ते प्रकरणे पाठविल्याची कुठेही नोंद आढळली नाही, असे सांगितले. त्याला सोमवारी न्यालयात हजर करण्यात येणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)