जितेंद्र आव्हाडांना अटक करा
By Admin | Updated: July 22, 2015 02:11 IST2015-07-22T02:11:07+5:302015-07-22T02:11:07+5:30
संभाजीराव भिडे गुरूजी व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका करणाऱ्या आमदार ...

जितेंद्र आव्हाडांना अटक करा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन
गोंदिया : संभाजीराव भिडे गुरूजी व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याची मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानने केली आहे. यासाठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख दुर्गेश रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदार संजय पवार यांना मंगळवारी (दि.२१) निवेदन देण्यात आले.
भिडे गुरूजी राजकारण, अर्थकारण व सत्ताकारण बाजूला ठेऊन कोणताही जातीय द्वेषभाव न बाळगता केवळ देशहितार्थ काम करीत आहेत. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून ते राष्ट्रकार्य करीत आहेत. तर बाबासाहेब पुरंदरे यांनी सत्तर पेक्षा जास्त वर्षे शिवचरित्रावर सखोल संशोधन करून, हजारो अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करून अत्यंत स्फूर्तीप्रेरणादायी शिवचरित्र लिहीले आहे. आजवर लाखो लोकांनी त्यांची पारायणे करून त्यातून देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा घेतली आहे.
असे असतानाही आमदार आव्हाड यांनी केवळ जातीय भावनेतून द्वेषपूर्ण व्यक्तव्ये करीत गावोगावी फिरत आहेत. हाच प्रकार त्यांनी १९ जुलै रोजी सांगली येथे केला. याप्रकरणी त्यांच्यावर सांगली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशाच्या आणि राज्याच्या एकसंधतेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक असल्याने आमदार आव्हाड यांना त्वरीत अटक करून कठोर कारवाईची मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानने केली आहे.
यासाठी संघटनेच्यावतीवे मंगळवारी (दि.२१) तहसीलदार पवार यांना निवेदन देण्यात आले. तसेच यानंतरही आव्हाड यांचे हे कृत्य थांबले नाही तर शिवप्रतिष्ठान आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकविणार असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख रहांगडाले यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र नारनवरे, सोनू रहांगडाले, मोनू मानकर, जयरामसिंह जतपेले, निशू जोशी, बाबा बिसेन, गोलू जोशी, कमलेश बनकर, अनील पारधी, राजू कवास, सुमित नेवारे, राकेश लांजेवर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)