धान खरेदीसाठी भाजपचा जिल्हाधिकार्यांना घेराव
By Admin | Updated: May 19, 2014 23:43 IST2014-05-19T23:43:25+5:302014-05-19T23:43:25+5:30
राज्य शासनाने ८ मे रोजी शासन निर्णय काढून आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

धान खरेदीसाठी भाजपचा जिल्हाधिकार्यांना घेराव
शासनाकडून त्वरित दखल : तीन दिवसात केंद्र सुरू न झाल्यास आंदोलन
गोंदिया : राज्य शासनाने ८ मे रोजी शासन निर्णय काढून आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा जिल्हा भाजपाने तीव्र निषेध करीत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत जिल्हाधिकार्यांना घेराव केला. या आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घेत २४ तासाच्या आत अहवाल मागविला आहे. येत्या तीन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेला असताना उन्हाळी धान पिकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक गणित जुळवत होता. मात्र राज्य शासनाने शेतकर्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. राज्य शासनाच्या १७ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानुसार ३० जूनपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदीचे आदेश होते. परंतु ऐनवेळी आचारसंहितेदरम्यान ८ मे रोजी राज्य शासनाने धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. सध्या जिल्ह्यात उन्हाळी धान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून येत्या आठ दिवसात हा हंगाम संपुष्टात येणार आहे. अशावेळी शेतकर्याला आधारभूत किंमत मिळणे आवश्यक असताना धान खरेदी केंद्राअभावी कवडीमोल भावात शेतकर्यांना हा धान खासगी व्यापार्यांना द्यावा लागत आहे. राज्य शासनाने निवडणूक आटोपताच आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचा अन्यायकारक घेऊन जिल्ह्यातील शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकर्यांचा छळ व व्यापार्यांना बळ देणार्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्यांनी ुजिल्हाधिकार्यांच्या कक्षासमोर बसून ठिय्या देवून त्यांचा घेराव केला व धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली. भाजपची आक्रमकता भूमिका बघून जिल्हा प्रशासनाने ही बाब राज्याचे प्रधान सचिव दीपक कपूर यांना कळविली. स्वत: आ.राजकुमार बडोले व जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी कपूर यांच्याशी चर्चा केली. धान खरेदी केंद्र सुरू होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. या बाबीची शासनाने गंभीर दखल घेत तातडीने याबाबत निर्णय घेत फॅक्सद्वारे पत्र पाठविले. त्यानुसार २० मेपर्यंत जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठवायला सांगितले आहे. यावर निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी शासनाने आंदोलनावर भूमिका घेत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन देत असल्याचे पत्र पाठविल्याचे सांगितले. येत्या दिवसात जिल्हा प्रशासनाद्वारे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास प्रत्येक तालुकास्तरावर अधिकार्यांना घेराव करुन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हा भाजपतर्फे देण्यात आला आहे. यादरम्यान जे व्यापारी कमी दरात धान खरेदी करतील त्यांच्यावर ईसीए अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर निर्देशही देण्यात आल्याचे कळते. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ. राजकुमार बडोले, माजी आ.केशव मानकर, हेमंत पटले, दयाराम कापगते, खोमेश्वर रहांगडाले, भेरसिंह नागपुरे, प्रदेश सदस्य नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री विजय रहांगडाले, दीपक कदम, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, सभापती कुसन घासले, प्रकाश गहाणे, सविता पुराम, मोरेश्वर कटरे आदींनी केले. (शहर प्रतिनिधी)