रेशनकार्डातील ३६ टक्के सदस्यांची आधारलिंकिंग
By Admin | Updated: September 9, 2015 01:57 IST2015-09-09T01:57:29+5:302015-09-09T01:57:29+5:30
आता रेशनकार्डही स्मार्टकार्डमध्ये परिवर्तित केले जाणार असल्याने त्यांना आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे.

रेशनकार्डातील ३६ टक्के सदस्यांची आधारलिंकिंग
उद्दिष्ट १३.६५ लाख नावांचे : वर्षभरापासून केशरी कार्डधारकांना रेशन बंद
देवानंद शहारे गोंदिया
आता रेशनकार्डही स्मार्टकार्डमध्ये परिवर्तित केले जाणार असल्याने त्यांना आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे. यांतर्गत रेशनकार्डात नोंद असलेल्या सदस्यांच्या नावांचे आधारलिंकिंग करावयाचे आहे. मात्र अनेकांचे आधार क्रमांक प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत रेशनकार्डांवरील केवळ ३६ टक्केच सदस्यांच्याच नावांची आधारलिंकिग झाल्याची माहिती आहे. असे असतानाही सदर डाटा एंट्रीचे काम राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पूर्वी पाच प्रकारचे रेशनकार्ड नागरिकांना त्यांच्या परिस्थितीनुरूप दिले जात होते. यात अंत्योदय, बीपीएल (पिवळे), एपीएल (केशरी), शुभ्र व अन्नपूर्णा (निळा व पोपटी) यांचा समावेश होता. अन्नपूर्णा लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत १० किलो तांदळाचा लाभ मिळत होता. मात्र ही योजनाच आता शासनाने बंद केली. शुभ्रकार्डधारकांना काहीही मिळत नसून ते कार्ड केवळ ओळखपत्राचेच काम करीत आहे. अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो धान्य प्रतिकार्ड दिले जाते. यात २५ किलो तांदूळ व १० किलो गव्हाचा समावेश आहे. तर बीपीएल कार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळते. यात दोन किलो तांदूळ व तीन किलो गव्हाचा समावेश आहे. तसेच केशरी कार्डधारकांना ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, त्यांना तांदूळ, गहू व केरोसिनचा लाभ मिळत होता. मात्र वर्षभरापूर्वीच शासनाने केशरी कार्डधारकांना मिळणारा सदर लाभ बंद केला.
जिल्ह्यात एकूण सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची संख्या २ लाख ८१ हजार ९७९ एवढी असून त्यात नमूद असलेली सदस्य संख्या १३ लाख ८७ हजार २३९ एवढी आहे. सध्या डिसेंबरपर्यंत १३ लाख ६५ हजार लोकांची नावे आधारलिंकिंग करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र यापैकी आतापर्यंत केवळ चार लाख ९० हजार नावे आधार क्रमांकाशी आॅनलाईन जोडण्यात आली आहेत. यात आतापर्यंत ३६ टक्के डाटा एंट्रीची कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. काही नागरिकांकडून त्यांचे आधारकार्ड अद्याप प्राप्त न झाल्यामुळे गावागावांत चावडी वाचन कार्यक्रमातून याबाबत माहिती दिली जात आहे. मात्र मेन डाटा कलेक्शन होऊ न शकल्यामुळे पर्याप्त प्रमाणात नागरिकांचे आधारलिंकिंग होऊ शकले नाही.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत आता अंत्योदय व पीएचएच
सध्या केवळ तीनच प्रकारचे रेशन कार्ड सुरू असून त्यात अंत्योदय, पीएचएच (प्रिआॅरिटी हाऊस होल्ड) व एपीएल कार्डांचा समावेश आहे. यापैकी अंत्योदय व पीएचएच धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ दिला जात आहे. बीपीएल कार्डसुद्धा बंद करण्यात आले असून त्यांच्या कार्डवर पीएचएच (प्रिआॅरिटी हाऊस होल्ड) म्हणजे प्राधान्य गटाचे लाभार्थी असा स्टॅम्प लावून लाभ बीपीएलचाच दिला जात आहे. तसेच ग्रामसभा व ग्रामपंचायतने ठरविलेल्या काही एपीएल केशरी कार्डधारकांच्या कार्डवर ‘प्राधान्य गटाचे लाभार्थी’ असा स्टॅम्प लावून प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जात आहे. यात तीन किलो तांदूळ व दोन किलो गव्हाचा समावेश आहे. पीएचएचमध्ये शहरी भागातून ४५ टक्के व ग्रामीण भागातून ७५ टक्के लोकांचा अंतर्भाव करण्याचे उद्दिष्ट होते.