तिरोडा बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती
By Admin | Updated: April 26, 2015 01:08 IST2015-04-26T01:08:21+5:302015-04-26T01:08:21+5:30
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियमन १९६३ चे कलम ४५ (१) नुसार व मा. पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे ...

तिरोडा बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती
तिरोडा : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियमन १९६३ चे कलम ४५ (१) नुसार व मा. पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश क्र. सीएम आर/आर/३५/अॅक्ट व रुल्स दि.१८ सप्टेंबर १९८१ या द्वारे अधिकारानुसार जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर यांनी बाजार समिती संचालक मंडळाला अधिक्रमण केले आहे. तसेच उक्त कायद्याचे कलम ४५ (२) क मधील तरतुदीनुसार बाजार समितीचे कार्य पार पाडण्याकरिता सहायक निबंधक अनिल गोस्वामी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
संचालक मंडळाने विविध प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीला आर्थिक नुकसानीत टाकले. त्याबाबत मुकेश अभिमन बरियेकर यांनी वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा केला.
त्यात बेकायदेशीर लॉटरी दुकान, गाळे वाटप, बेकायदेशीर आठवडी बाजार, बैठकी व मवेशी बाजार ठेका देणे, उपसभापती यांनी मुलाला कामावर घेण्याकरिता समितीची दि. २९ जानेवारी १४ रोजी विशेष सभा बोलावून ४/२०१४ ठराव क्र.९/१ पारीत करणे, शेतकरी प्रतिनिधी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आडत व्यवसाय करुन पदाचा गैरवापर करणे, बेकायदेशीर खर्चाची उधळपट्टी, संचालक मंडळ अग्रीम, आर.के.व्ही.वाय. योजनेंतर्गत तयार करण्यात आलेले गोदाम बेकायदेशीर परस्पररीत्या समिती सदस्याने रासायनिक खताच्या साठ्यासाठी वापरणे आणि त्यामुळे शेतमाल तारण योजना राबवणे अशक्य असणे, उत्तम कोतवाल यांना सचिव पदाचा पदभार सोपविण्यास नकार दिल्याबाबत वरील सर्व मुद्यांवर सविस्तर सखोल चौकशी केली.
संबंधितांना खुलासे मागविण्यात आले. काहींनी खुलासे ही सविस्तर सादर केले. पण ते समाधानकारक नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी जा. क्रमांक/जिऊनि/वि-१/कृउबास/ तिरोडा कलम ४५/४१६५/१५द कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया दि. २४ एप्रिल २०१५ नुसार बाजार समिती संचालक मंडळाचे अधिकार कमी करुन प्रशासक म्हणून सहा. निबंधक अनिल गोस्वामी यांची नियुक्ती केली. प्रशासकांनी कार्यभार ग्रहण केल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत सदर बाजार समितीच्या निवडणूक त्या कालावधीत घेतल्या जातील अशी कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)