केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदारांना मानधन लागू करा
By Admin | Updated: March 18, 2016 02:10 IST2016-03-18T02:10:05+5:302016-03-18T02:10:05+5:30
केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदारांना २० हजार रूपये मानधन लागू करण्यात यावे.

केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदारांना मानधन लागू करा
आंदोलनाचा पवित्र्यात : हॉकर्स-रिटेलर्स फेडरेशनचा इशारा
गोंदिया : केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदारांना २० हजार रूपये मानधन लागू करण्यात यावे. तसेच केरोसिन विक्रेत्यांना गॅस एजंसी देण्यात यावे, त्यानंतरच केरोसिनवर अनुदानाचा विचार करण्यात यावे, अशी मागणी केरोसिन हॉकर्स-रिटेलर्स फेडरेशनने केली आहे.
सदर फेडरेशनचे राज्य अध्यक्ष बाबुराव मेश्राम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार, सदर योजनेंतर्गत केरोसिनवरील अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल व केरोसिनची खरेदी रक्कम शासनाच्या खजिन्यात जमा होईल. तेव्हा या कामाच्या मोबदल्यात केरोसिन विक्रेत्यांना मानधन देण्यात यावे. परवानाधारक प्रतिलिटर मागे केवळ २२ पैसे कमिशनवर ४० वर्षांपासून हमाली करीत आहेत. त्यामुळे त्यांना आता कमिशन नव्हे तर मानधन देण्यात यावे, अशी मागणी आहे.
गोंदिया, भंडारा, अमरावती, लातुर, नांदेड, नंदूरबार या सहा जिल्ह्यांचा समावेश करून केरोसिनवरील अनुदान (आॅनलाईन) योजना सुरू करण्याचा निर्णय घेवून शासन परवानाधारकांवर अन्याय करीत आहे.
काही केरोसिन विक्रेत्यांचा केवळ १०० लिटरचा मासिक कोटा आहे. त्यांना केवळ ११ रूपये कमिशन मिळते, मात्र त्यांना ३०० रूपयांचा रजिष्टर घ्यावा लागतो. तसेच रेशन दुकानदारांना प्रतिकिलोमागे केवळ ७० पैसे कमिशन मिळते. एपीएल कार्डधारकांचा रेशन बंद करण्यात आला आहे.
अशा स्थितीत परवानाधारक आपल्या कुटुंबाचा पोलनपोषण करू शकत नाही. त्यासाठी केरोसिन विक्रेत व रेशन दुकानदार यांना २० हजार रूपये मानधन देण्यात यावे व कमी करण्यात आलेले केरोसिनचे मासिक कोटे वाढविण्यात यावे, अशी मागणी अनेकदा शासनाकडे करण्यात आली आहे.
आधी परवानाधारकांना मानधन द्यावे, केरोसिनचे कोटे वाढविण्याची तरतूद करावी व केरोसिन विक्रेत्यांना गॅस एजंसी देण्यात यावे, त्यानंतरच केरोसिनवर आॅनलाईन अनुदानाचा विचार करण्यात यावा. तसेच या योजनेबाबत कागदपत्र मागविण्याची घाई करून परवानाधारकांना त्रस्त करण्यात येवू नये अन्यथा संघटनेद्वारे आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय मोर्चा व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मागण्या पूर्ण करण्यात न आल्यास राज्यभरात १ एप्रिलपासून केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदार बेमुदत आंदोलन करतील, अशी माहिती राज्य अध्यक्ष मेश्राम यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)