मत्स संवर्धनाचा कार्यक्रम राबवा
By Admin | Updated: February 10, 2016 02:19 IST2016-02-10T02:19:48+5:302016-02-10T02:19:48+5:30
पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव मोठ्या प्रमाणात आहेत.

मत्स संवर्धनाचा कार्यक्रम राबवा
वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार : माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरण
गोंदिया : पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव मोठ्या प्रमाणात आहेत. या तलावात मोठ्या प्रमाणात सिंचनाची क्षमता आहे. या तलावांच्या खोलीकरणाची कामे प्रभावीपणे करून मत्स्य संवर्धनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवा, असे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
सोमवारी (दि.८) विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, पालक सचित पी.एस. मीना, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीची कामे करण्यासाठी यांत्रिकी विभागाची मदत घ्यावी. त्यामुळे खर्च कमी येईल. विविध यंत्रणा व लोकसहभागातून तलावांच्या दुरूस्तीची व जलयुक्त शिवार अभियानाची कामे करावी. कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती जास्तीत जास्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मत्स्य संवर्धन व उत्पादन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशचा दौरा करावा, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.जिल्ह्यातील तलावांवर अतिक्रमण होणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, अशा तलावांतून जास्तीत जास्त सिंचन क्षमता निर्माण होईल, याचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातील १० पर्यटन स्थळांचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व वन पर्यटनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा.
१०० एकरापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या तलावांच्या खोलीकरणाचे काम चांगले झाले असून त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या एक हजार ७०० तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन करून तलाव खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात यावा. त्यामधून मत्स्य संवर्धं मोठ्या प्रमाणात करता येईल, असे त्यांनी सांगितले. पाणी पुरवठा व स्वच्छता, ग्राम विकास, रस्ते विकास, लघू पाटबंधारे यासाठी अधिक निधी देण्यात यावे, अशी अपेक्षासुद्धा पालकमंत्री बडोले यांनी व्यक्त केली.
आ. अग्रवाल यांनी माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी, दिवाबत्तीच्या विद्युत खांबासाठी, वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा. तसेच निधीमध्ये कपात करण्यात येवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१४-१५ मध्ये ८५ कोटी रूपये अर्थसंकल्पीत असता ८४ कोटी ९३ लाख रूपये खर्च करण्यात आले तर सन २०१५-१६ च्या योजनेत ११४ कोटी ९२ लाख अर्थसंकल्पीत असता जानेवारी २०१६ अखेर ३२ कोटी ३७ लाख रूपये खर्च करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला असून ८६ कोटी ५७ लाख रूपये शासनाने ठरवून दिलेलेली आर्थिक मर्यादा असून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी १९९ कोटींची मागणी केली आहे. यामध्ये अतिरिक्त मागणी ११२ कोटी ४३ लाख रूपयांची आहे.
सदर बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)