देवरी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कौंसिलचे त्रिवार्षिक अधिवेशन क्रांतीकारी शहिद भगतसिंग कामगार भवन सभागृहात बाबूराव राऊत यांच्या अध्यक्षतेत पार पडले.उद्घाटन राज्य कौंसिल सदस्य हौसलाल रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रथम पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते बाबूलाल पारधीच्या हस्ते लालझेंडा फडकविण्यात आला. नंतर पक्षाच्या दिवंगत कॉम्रेड्सना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. तालुका सचिव शंकर बिंझलेकर यांनी तीन वर्षात झालेल्या आंदोलन, संघटनात्मक व पक्षाच्या कार्याचा अहवाल अधिवेशनात सादर केल्यावर ग्राम शाखेच्या ३० प्रतिनिधींनी त्यावर चर्चा करुन आपल्या गावांची समस्या विशद केली व त्याला पारित केले.याप्रसंगी रहांगडाले यांनी, पक्षाद्वारे झालेल्या आंदोलनासह राजकिय मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक जिल्हा सचिव मिलिंद गणवीर यांनी संघटनात्मक पक्ष अधिवेशनाचे महत्व सांगून येणारे केंद्रिय, राज्य आणि जिल्हा अधिवेशन ९ व १० फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथे आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. त्यात तालुका अधिवेशनात निवड केलेल्या प्रतिनिधींने आवश्य सहभागी व्हावे असे आवाहन केले. अधिवेशनाचा समारोपप्रसंगी जिल्हा सहसचिव शेखर कनौजीया यांनी, केंद्र सरकारच्या जनविरोधी नितिच्या विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. अधिवेशनात तीन वर्षाकरीता तालुका कौंसीलची निवड करण्यात आली. त्यात तालुका सचिवपदी शंकर बिंझलेकर, तालुका सहसचिव रेखा तराम, कोषाध्यक्ष बाबू राऊतसह २१ सदस्यांची निवड करण्यात आली. आभार सदाराम कोसरे यांनी मानले. अधिवेशनाला मोठ्या संख्येत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)
अधिवेशनातून जनसंघर्षाचे आवाहन
By admin | Updated: January 23, 2015 01:31 IST