गैरमार्गाविरूध्द लढा कृती कार्यक्रम
By Admin | Updated: February 11, 2015 01:30 IST2015-02-11T01:30:48+5:302015-02-11T01:30:48+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत राज्यातील नऊ विभागीय मंडळाव्दारे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये...

गैरमार्गाविरूध्द लढा कृती कार्यक्रम
केशोरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत राज्यातील नऊ विभागीय मंडळाव्दारे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये इयत्ता १० व १२ वीच्या परीक्षांचे आयोजन केले आहे. या परीक्षांना राज्यातून सुमारे ३२ लाख विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्वसमावेशक असा कृती कार्यक्रम आखून गैरमार्गाविरूध्द लढा हा कार्यक्रम राबविण्याचे दृष्टीने समाजातील घटकांचा सहभाग घेऊन तणावमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन शाळा व महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून केले आहे.
परीक्षेत विविध मार्गानी निष्पन्न होणाऱ्या गैरप्रकाराचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्यादृष्टीने मंडळ आपापल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. शिक्षण मंडळाने गैरमार्गाविरूध्द लढा या कृती कार्यक्रमांतर्गत परीक्षा केंद्राबाहेरील उपद्रव थांबविण्यासाठी समाजाची मदत घेऊन स्थानिक दक्षता समित्यांच्या माध्यमातून नियंत्रण आणणे, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी व संस्थाचालक यांचे उद्बोधन व समुपदेशन करण्याचे वेळापत्रक तयार करून ते कार्यवाहीत आणणे, विद्यार्थ्यांना गैरमार्गापासून परावृत्त करण्यासाठीच्या प्रयत्नांबरोबर शिक्षा सुची विषयक नियम यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका, केंद्र, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर दिलेल्या कालावधीत बैठका आयोजित करून गैरमार्गाविरूध्द लढा या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शिवाय शहरी व ग्रामीण भागात केंद्रस्थळी दक्षता समित्या गठीत करून दक्षता समितीची संरचना साधारणत: अशी निश्चित केली आहे. सरपंच, पोलीस पाटील, शिक्षण समिती सदस्य, माजी सैनिक, तरूण मंडळ अध्यक्ष, पालक प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, बचत गटाचे सदस्य, प्रतिष्ठीत संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस प्रतिनिधी, तंटामुक्त समिती प्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश करून दक्षता समिती निर्माण करण्यात यावी असे सूचित केले आहे. (वार्ताहर)