अजून ६४२ मिमी पावसाची गरज

By Admin | Updated: August 26, 2015 01:35 IST2015-08-26T01:35:41+5:302015-08-26T01:35:41+5:30

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ७०७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Another 642 mm rain requirement | अजून ६४२ मिमी पावसाची गरज

अजून ६४२ मिमी पावसाची गरज

आतापर्यंत ७०७ मिमी : एक महिन्यात वार्षिक सरासरी गाठणे अशक्य
गोंदिया : दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ७०७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २५ आॅगस्टपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ७० टक्केच असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत जेमतेम ५२ टक्केच आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या अवघ्या एक महिन्यात ६४२ मिमी पाऊस पडणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा परिस्थिती यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात रोवणी जवळपास ९६ टक्के आटोपली आहे. त्यामुळे रोवलेल्या धानपिकाच्या कोवळ्या रोपांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार आतापर्यंत (दि.२५ आॅगस्ट) जिल्ह्यात १००९.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत ३०१.८ मिमी पाऊस कमी पडला आहे.
सर्वसाधारणपणे पावसाच्या चार महिन्यात, म्हणजे १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १३४९.६१ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र पावसाळ्याचा आता केवळ एक महिना शिल्लक असताना ७०७.४ मिमी पाऊस पडल्याने अपेक्षेएवढा पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असून आर्थिक नुकसान सहन करण्याची पाळी येऊ शकते.
पावसाच्या चार महिन्यातील तालुकानिहाय प्रमाण पाहता गोंदिया तालुक्यात सप्टेंबर अखेरपर्यंत १२१७.३० मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असताना आतापर्यंत केवळ ६४४.१ मिमी पाऊस पडला आहे. तिरोडा तालुक्यात ११३७ मिमी पावसाची अपेक्षा असताना ६४२.१ मिमी, गोरेगाव तालुक्यात १४१८.८२ मिमीऐवजी आतापर्यंत ७७५.८ मिमी पाऊस झाला.
आमगाव येथे १४१८.८२ मिमीऐवजी आतापर्यंत केवळ अर्धाच म्हणजे ७४२ मिमी पाऊस पडला आहे. देवरी तालुक्यात १३५७.८० मिमीच्या तुलनेत केवळ ६०६.७ मिमी, सालेकसा तालुक्यात १४१८.८२ मिमीच्या तुलनेत ७८६.३ मिमी, सडक-अर्जुनी तालुक्यात १४००.९२ मिमीच्या तुलनेत आतापर्यंत ८३०.४ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४२७.४० मिमी पडतो. मात्र आतापर्यंत ६७ टक्के म्हणजे ७३१.४ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Another 642 mm rain requirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.